काँग्रेसला लागण झाल्याची टीका, विरोधकांचेही प्रत्युत्तर
लखनौ/ नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मुस्लीम लीग ही विषाणूसारखी असल्याचा उल्लेख केला. या ‘विषाणू’ने काँग्रेसला ग्रासले असल्याची टीका त्यांनी केल्यानंतर विरोधकांनी योगी हेच विषाणू असल्याचे प्रत्युत्तर दिले. या निवडणुकीत त्यांचे निर्मूलन केले जाईल, असा टोलाही विरोधकांनी लगावला आहे.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीटमुळे हा सर्व शाब्दिक धुरळा उडाला आहे.
आदित्यनाथ आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘मुस्लीम लीग म्हणजे विषाणू आहे. या विषाणूची ज्याला बाधा होईल, तो जिवंत राहू शकत नाही आणि सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ही बाधा झाली आहे. ते जर जिंकले तर काय होईल याचा विचार करा. हा विषाणू सर्व देशभरात पसरेल.’
केरळमध्ये ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ ही दीर्घकाळपासून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीचा घटक आहे. या लीगची फाळणीपूर्व मुस्लीम लीगशी तुलना करून आदित्यनाथ यांनी वरील टीका केल्याचे मानले जाते.
योगी आदित्यनाथ यांना एखाद्या विषाणूची बाधा झाली की काय? या जहाल हिंदुत्ववादी नेत्याला काहीही माहीत नाही. त्यांना केवळ लोकांशी विश्वासघात कसा करायचा हे माहीत आहे. विकासाच्या मुद्दय़ावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच ते अशी वादग्रस्त विधाने करीत आहेत.
– अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख