मध्य प्रदेशात हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. जर तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशी धमकी त्याने नर्सिंगची विद्यार्थनी असणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला दिली होती. आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करत होता.
मोनू मन्सूरी असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. सोमवारी त्याने मुलीला थांबवून तिच्यावर फुलं उधळली होती. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. आरोपी मोनू मन्सूरी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. मुलीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला तिचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याने व्हॉट्सअपला मेसेज पाठवून लग्नाचा प्रस्ताव नाकारला तर हत्या करेन अशी धमकी दिली होती.
मुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “तो मुस्लीम तरुण आहे. माझा हात पकडून तो माझ्यावर ओरडला. त्याने माझ्यावर फुलं फेकली आणि तुझी हत्या करेन म्हणाला. त्याने हातात बंदूक पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवला”.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मोनू मन्सारीला अटक करण्यात आली आहे. फसवणुक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे”.
मोनू मन्सूरी पाठलाग करत असताना तसंच फुलं उधळली तेव्हा मुलीने मदत मागितली होती. पळून जाण्याआधी आरोपीने मुलीला धर्मांतर केलं नाही तर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली असं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीने हिंदू संघटनांकडेही मदत मागितली आहे.