जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्व काळात मांस बंदीच्या निर्णयाला जशास तसे उत्तर देण्याच्या उद्देशाने बंगळुरूच्या एका मुस्लिम विनोदी कलाकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अनोखे अभियान सुरू केले आहे. ‘बकरी ईद’च्या निमित्ताने भाज्यांवर बंदी आणण्याची मागणी करणारा प्रस्ताव फलाह फैजल यांनी Change.org या संकेतस्थळावर दाखल केला असून त्यास अनेकांचा पाठिंबा मिळण्यास सुरूवात झाली आहे.

पर्युषण पर्व काळानिमित्त जैन धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन अनेक राज्यांनी मांसबंदीचा निर्णय घेतला. मग मुस्लिम धर्मीयांच्याही भावना लक्षात घेऊन ‘बकरी ईद’च्या दिवशी भाज्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असे फलाह फैजल यांनी आपल्या मागणीपत्रात लिहीले आहे. तसेच मुस्लिम बंधू जर रमझानच्या महिन्यात उपाशी राहू शकतात तर, शाकाहारी बांधवांना एक दिवस उपाशी राहण्यात काहीच हरकत नसावी, असेही फैजल पुढे म्हणाले.

भाज्यांवरील बंदीची मागणी जर मान्य होणारी नसेल तर त्यासाठी फैजल यांनी पर्यायी मागणी देखील सुचविली आहे. मुस्लिम बंधूंच्या भावनांचा सन्मान करून देशातील प्रत्येक धर्माच्या लोकांनी बकरी ईदच्या दिवशी मटन बिर्याणी खाऊन या सणात सहभागी व्हावे, असे फैजल यांनी आवाहन केले आहे. फैजल यांच्या या ऑनलाईन प्रस्तावाला ५०० हून अधिक जणांचा पाठिंबा मिळाला असून आपले लक्ष्य गाठण्यासाठी आणखी ४९९ जणांच्या पाठिंब्याची गरज आहे.

Story img Loader