उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर येथे एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये तपास करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा तरुण करत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळेच त्याची हत्या झाल्याची चर्चा आहे. म्हणूनच या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यामधील २५ वर्षीय बाबर अली या तरुणाचा रिवारी मृत्यू झाला. त्याच्या शेजाऱ्यांनी भाजपाच्या प्रचारामध्ये तसेच विजयानंतरच्या विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन बाबरला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबरचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यासंदर्भातील ट्विट करण्यात आलं आहे. या प्रकरणासंदर्भात योगी आदित्यनाथ नक्की काय म्हणाले आहेत आणि त्यांनी काय आदेश दिलेत हे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलंय. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर येथील कठघरही गावातील बाबर या तरुणाचा लोकांनी मारहाण केल्यानंतर मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी या तरुणाच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्यात. या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत,” असं सांगण्यात आलं आहे.
बाबरला २० मार्च रोजी मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा लखनऊमधील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. रविवारी बाबरचा मृतदेह त्याच्या गावी नेण्यात आला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. दोषींवर कारवाई कर मगच आम्ही अत्यंस्कार करु अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
बाबरच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे शेजरी हे बाबर भाजपासाठी प्रचार करतो म्हणून त्याच्यावर नाराज होता. १० मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बाबरने मिठाई वाटली होती. यावेळेस त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला भाजपाला पाठिंबा देऊ नकोस असा इशारा दिल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय.