शाळांमध्ये येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. योग दिवस म्हटला की सहाजिकच सुर्यनमस्कार करणे आले. मात्र, मुस्लिम धर्मात नमाज अदा करतेवेळी केवळ अल्ला समोरच वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. अल्ला शिवाय इतर कोणासमोरही वाकून नमस्कार करणे मुस्लिम धर्म सांगत नाही. यामुळे योग दिवस साजरा करण्याच्या शासनाच्या सक्तीवर आक्षेप असल्याचे मुंबईतील जमात-ए-इस्लामी हिंद शिक्षण संस्थेचे सचिव मोहम्मद झहूर अहमद यांनी सांगितले. तसेच या विषयी बातचीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचेही मुस्लिम शिक्षण संस्थांनी ठरविले आहे. मोहम्मद अहमद म्हणाले की, “योगामध्ये सुर्यनमस्कार करावा लागतो. मात्र मुस्लिम धर्मात अल्ला शिवाय इतर कोणाही समोर वाकून नमस्कार करण्याची पद्धत नसल्याने मुस्लिम विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार करणे योग्य वाटणार नाही. यातून भावना दुखावल्या जातील. यामुळे योग दिवस मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी विकल्प असावा त्याची सक्ती करणे अयोग्य ठरेल.”
रविवार, आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जून रोजी रविवार येत असला, तरी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात यावे असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. योग दिन एका दिवसापुरता योग सिमीत न राहता महाराष्ट्रात आता योगपर्व सुरू करुया आणि हा दिवस यशस्वी करुया तसेच योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी निर्माण करुया, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.
योग दिनाच्या सक्तीवर मुस्लिम शिक्षण संस्थांचा आक्षेप
शाळांमध्ये येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे.

First published on: 03-06-2015 at 03:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim organisations in mumbai object to compulsory yoga day in schools