लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लीम आरक्षणाचा विषय चांगलाच तापविण्यात आला. काँग्रेसने कर्नाटकमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. तसेच “धर्माच्या आधारावर मुस्लीमांना आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही ते कधीही देणार नाही”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरकसपणे मांडली होती. लोकसभेच्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत गाठता आलेले नाही. आता त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा टेकू घ्यावा लागणार आहे. अशातच नायडूंच्या तेलगू देसम पक्षाच्या (TDP) नेत्याने मुस्लीम आरक्षण कायम राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. ज्यामुळे आता भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
टीडीपीचे नेते काय म्हणाले?
तेलगू देसम पक्षाचे (TDP) नेते के. रवींद्र कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज एनडीएची दुसरी बैठक होत आहे. ५ जून रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आजच्या बैठकीत सरकार स्थापनेसंबंधी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होऊ शकते. तसेच आजच एनडीएच्या खासदारांचीही बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. आजच्या बैठकीत आम्ही आमचे मुद्दे मांडू. यावेळी पत्रकारांनी त्यांना आंध्र प्रदेशमधील मुस्लीम आरक्षणासंबंधी प्रश्न विचारला. राज्यातील मुस्लीम आरक्षण कायम राहणार का? या प्रश्नावर बोलताना रवींद्र कुमार म्हणाले, “मुस्लीम आरक्षण जैसे थे राहिल. त्यात काहीच अडचण नाही.”
भारतातील धर्मावर आधारित आरक्षणाचा संक्षिप्त इतिहास; मुस्लिमांचा ओबीसीमध्ये समावेश कसा झाला?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने मुस्लीम आरक्षणाविरोधात तिखट प्रचार केल्यानंतर आंध्र प्रदेशचे नुकतेच पायउतार झालेले मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या मुद्द्याचे भांडवल करत तेलगू देसम पक्ष आणि एन. चंद्राबाबू नायडू यांना लक्ष्य केले होते. एनडीए आणि नायडू यांचे सरकार आल्यास, ते राज्यातील ४ टक्के मुस्लीम आरक्षण संपुष्टात आणतील, असा आरोप जगनमोहन रेड्डी यांनी केला होता.
आंध्र प्रदेशमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना जगनमोहन म्हणाले की, चंद्राबाबू नायडू सरड्या सारखे रंग बदलत आहेत. राज्यातील मुस्लीम आरक्षण कायम राहिल, हा वायएसआर काँग्रेसचा शब्द आहे. आमचा चंद्राबाबू नायडू यांना थेट प्रश्न आहे. जर एनडीएचे सरकार आले आणि त्यांनी मुस्लीम आरक्षणाला विरोध केला तरी नायडू एनडीएचा भाग राहणार का?
“मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
वायएसआर काँग्रेसच्या या आरोपानंतर टीडीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनीही मुस्लीम आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे जाहीर केले होते. आंध्र प्रदेशमध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले जाते, ते यापुढेही कायम राहिल, असा शब्द नायडू यांनी दिला होता. मुस्लीम आरक्षण कायम राहावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊ. तसेच मुस्लीम समुदायासाठी अनेक कल्याणकारी योजना हाती घेऊ, असाही शब्द त्यांनी दिला होता.
भाजपाची कोंडी?
लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्ष बहुमतापासून दूर राहिला आहे. २७२ ही संख्या गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे. तेलगू देसम पक्षाचे १६ खासदार निवडून आल्यामुळे एनडीएचे सरकार तरू शकते. मात्र ज्या मुद्द्यावर संपूर्ण प्रचारात आक्रमक भूमिका घेतली, त्याच विषयावर आता सरकार वाचविण्यासाठी नमती भूमिका घ्यावी लागते का? हे पुढील काळात समजू शकते. चंद्राबाबू नायडू यांनी प्रचारातच चार टक्के आरक्षण कायम राहणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे तेही आपल्या शब्दावर कायम राहतात का? हे पाहावे लागेल.