उत्तराखंडचे भाजपा आमदार राजकुमार ठुकराल यांनी मुस्लिम युवकांनी हिंदू तरुणींसोबत मंदिर परिसरात फिरु नये असा इशारा दिला आहे. उत्तराखंडमधील रामनगर येथे मंदिर परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठुकराल यांनी हे वक्तव्य केले आहे. मागच्या आठवडयात रामनगर येथील गरजिया मंदिर परिसरात इरफान (२३) आणि १९ वर्षीय हिंदू तरुणी एकत्र फिरत होते. त्यावरुन परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मुस्लिम युवक आणि हिंदू तरुणी मंदिर परिसरात फिरत असल्याचे समजल्यानंतर तिथे जमाव जमला होता. जमावाने इरफानला मारहाण सुरु केली होती तितक्यात शिख पोलीस अधिकारी गगनदीप सिंग घटनास्थळी पोहोचले व त्यांनी इरफानची सुटका केली.
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजकुमार ठुकराल म्हणाले कि, मुस्लिम युवक मंदिर परिसरात हिंदू तरुणींसोबत का फिरतात ? ज्यांना रामनगरचे वातावरण बिघडवायचे आहे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. रामनगर पोलीस आणि प्रशासनाचे वेळीच डोळे उघडले नाहीत तर हिंदू सेना आपल्या पद्धतीने हिंदू संस्कृतीच्या मूळावर येणाऱ्यांना धडा शिकवेल असे ठुकराल यांनी म्हटले आहे.
गगनदीप सिंग वेळेत पोहोचले नसते तर जमावाने इरफानला तरुणाला ठेचून मारले असते. जमाव या मुलाला मारहाण करण्याच्या तयारीत होता पण गगनदीप सिंग यांनी या मुलाला आपल्या छातीजवळ पकडले होते. गगनदीप यांनी स्वत:च्या शरीराची ढाल करुन या मुलाचे रक्षण केले. गगनदीप यांनी हिंसक झालेल्या जमावासमोर जी हिम्मत दाखवली त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर ते हिरो ठरले आहेत.