मुस्लिम निश्चिंतपणे देशात राहू शकतात. पण त्यांना गोमांस खाणे सोडून द्यावे लागेल, हे विधान आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे. त्यांच्या या नव्या विधानामुळे सत्ताधारी भाजप सरकार आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी दादरी आणि गोमांस या दोन्ही विषयांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, दादरीमध्ये जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे होते. केवळ गैरसमजुतीतूनच हा प्रकार घडला. गीता, सरस्वती आणि गायीला देशातील मोठा समाज आजही पवित्र मानतो. अनेकांची यावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्याचा विचार करून मुस्लिमांना गोमांस खाणे सोडून द्यावे लागेल.
खट्टर सरकारला या महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दादरी प्रकरण आणि गोमांस यावर आपली बाजू मांडली. खट्टर गेल्या चार दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. हरियाणा विधानसभेने मंजूर केलेले गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक ही आपल्या सरकारची मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader