बिहारमधील भागलपुरचे भाजपा आमदार ललन पासवान यांनी धार्मिक रुढी परंपरेबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी एका व्हिडीओमध्ये धार्मिक रुढी परंपरेवर भाष्य केलं आहे. आपण मानलं तर देव असतो, नाहीतर तो दगड असतो. लोकं जेव्हा तर्काच्या आधारावर विचार करतील, तेव्हा अंधश्रद्धा संपेल, असं विधान पासवान यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी काही उदाहरणंही दिली आहे. त्यांच्या विधानावर काही लोकांनी आक्षेप घेतला असून त्यांचा पुतळा जाळला आहे.
आमदार ललन पासवान व्हिडीओत काय म्हणाले?
“जोपर्यंत लोकं आत्मा-परात्मा यासारख्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवतील, तोपर्यंत ते अंधश्रद्धेच्या चक्रात अडकतील. पण जेव्हा लोकांची बौद्धिक क्षमता वाढेल आणि ते रुढी परंपरेऐवजी तर्काच्या आधारावर या गोष्टींकडे पाहतील. तसेच जेव्हा त्यांचे विचार वैज्ञानिक- सामाजिक असतील, तेव्हा ते लोकंही आपल्यासारखेच वाटतील.”
“हिंदू धर्मामध्ये सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. पण मुस्लीम बांधव सरस्वतीची पूजा करत नाहीत. मग ते विद्वान नसतात का? ते आयएएस किंवा आयपीएस अधिकारी नसतात का? देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते. धनप्राप्ती व्हावी म्हणून दिवाळीत लक्ष्मीची पूजा केली जाईल. यामुळे धन मिळेल. पण मुस्लीम बांधव लक्ष्मीची पूजा करत नाहीत, तरीही ते कोट्यधीश आहेत” असं विधान ललन पासवान यांनी केलं आहे.
हेही वाचा- “…तर आकाशातून पाणी टाकू का?” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान
पासवान पुढे म्हणाले “मुस्लीम आणि इतर धर्माचे लोक हनुमानाची पूजा करत नाहीत. अमेरिकेत हनुमानाचं मंदिर नाही, तिथे हनुमानाची पूजाही केली जात नाही. मग अमेरिका हे शक्तिशाली राष्ट्र नाही का? सर्व काही आपल्या मानण्यावर आहे. मानलं तर देव असतो, नाहीतर दगड असतो. जसं जसं तुम्ही मानणं बंद कराल, तसं तसं ते संपत जातील. त्यासाठी तर्काच्या आधारावर विचार करावा लागेल.”