Zipline Operator Allahu Akbar Chant : पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अनेक व्हिडिओ समोर आले. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये एक झिपलाइन ऑपरेटर गोळीबार सुरू असताना अल्लाह-हूँ-अकबर म्हणत असताना दिसला. गोळीबार सुरू झाल्याचं त्याच्या लक्षात येऊनही त्याने त्याच्या पर्यटकाला झिपलाईनवर जाऊ दिलं, असा दावा केला जातोय. या प्रकरणी या झिपलाइन ऑपरेटरला NIA ने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशीही सुरू केली आहे. दरम्यान, यावरून वादंग निर्माण झालेला असताना पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “सोशल मीडियावर काहीजण धार्मिक आहेत. जसं जय श्री राम म्हटलं जातं तसंच, अल्लाह-हूँ-अकबर म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता. पण सोशल मीडियावर अशाप्रकारे विष पसरवलं जात आहेत.”

“भारत सरकारने यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. भारतातील पर्यटक मारले गेले आहेत, त्यांच्या घरातील लोक त्यांचं कार्य करत आहेत. ज्या काश्मिरी लोकांनी दहशतवाद्यांविरोधात निर्देशने केली, दुकाने बंद केली त्या काश्मिरी लोकांविरोधात वाईट पसरवलं जात आहे. यावर निर्बंध आणला पाहिजे”, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

ऋषी भट्ट या पर्यटकाने व्हिडीओबाबत काय सांगितलं?

ऋषी भट्ट या पर्यटकाचा हा व्हिडीओ असून त्याने सांगितलं की, “मी पहलगामला झिपलाईनवर होतो. त्यावेळी मी व्हिडीओ अगदी सहज म्हणून घेतला. मला माहीतही नव्हतं की दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला आहे. पण ती घटना माझ्या मोबाइल व्हिडीओत नकळत कैद झाली”, असं ऋषी भट्टने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

ऋषी भट्ट यांचा अहमदाबादमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. भट्ट त्यांच्या कुटुंबासह १६ ते २७ एप्रिल या कालावधीसाठी काश्मीरला सुट्टीसाठी आले होते. त्यावेळी २२ तारखेला म्हणजेच मागच्या मंगळवारी हा हल्ला झाला. ऋषी भट्ट यांच्यासह त्यांची पत्नी भक्ती आणि मुलगा प्रीतही होते.

मी झिपलाईन राईडवरुन व्हिडीओ घेत होतो. साधारण २० सेकंदांनी मला कळलं की दहशतवादी हल्ला झाला आहे. चार ते पाच लोक गोळी लागून खाली पडले आहेत. दोन ते तीन गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा मला हा हल्ला असेल असं काही वाटलं नाही. पण मी जेव्हा गोळ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर ऐकला आणि दोन तीन जणांना खाली पडताना पाहिलं तेव्हा हा दहशतवादी हल्ला आहे हे लक्षात आलं. मी माझ्या मोबाइलला सेल्फी स्टिक लावली होती आणि हा व्हिडीओ घेत होतो, असंही भट्ट यांनी सांगितलं.