BJP MLA Haribhushan Thakur on Holi: संभलमधील पोलीस अधिकाऱ्याने होळीच्या दिवशी मुस्लिमांना घरीच थांबण्याचा सल्ला दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांचे समर्थन केले होते. आता बिहारमधील भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनीही अशाप्रकारचे विधान केले आहे. यावर्षी १४ मार्च रोजी धुलिवंदन सण येत आहे. योगायोगाने या दिवशी शुक्रवार येत आहे. रमजानचा महिना सुरू असल्यामुळे शुक्रवारी नमाज पठणासाठी मुस्लीम समुदाय बाहेर येऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर अशा विधानांची मालिका सुरू आहे.

हरिभूषण ठाकूर हे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी विधानसभेचे आमदार आहेत. सोमवारी बिहार विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, शुक्रवारी होळीचा सण येत आहे आणि योगयोगाने शुक्रवारी रमजान महिन्यातला जुम्माही आहे. मी सर्व मुस्लीम समुदायाला आवाहन करतो की, त्यांनी घरीच थांबावे आणि आम्हाला विनाअडथळा होळीचा सण साजरा करू द्यावा. वर्षभरात ५२ शुक्रवार येतात त्यांनी (मुस्लीम) या होळीचा एक शुक्रवार सोडून द्यावा.

“होळीच्या दिवशी तुम्ही बाहेर पडलात आणि तुमच्यावर कुणी रंग फेकला तर राग मानून घेऊ नका”, असेही हरिभूषण ठाकूर म्हणाले.

ठाकूर पुढे म्हणाले, एका बाजूला मुस्लीम समुदाय होळीच्या आधी अबीर आणि गुलाल विकून पैसे कमवतो. पण दुसऱ्या बाजूला होळीच्या दिवशी रंगापासून लांब राहतो. सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी एकमेकांच्या धर्माचा आणि धार्मिक प्रथांचा आदर राखला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

तेजस्वी यादव यांची टीका

भाजपा आमदारांच्या या विधानावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. “भाजपा समाजात फूट पाडणारे राजकारण करत आहे. धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. हा बिहार आहे, इथे भाजपा-संघ आणि संघ परिवाराच्या उद्देशाला यश मिळणार नाही. त्यांना वाटते की, ते आमच्या मुस्लीम बांधवांमध्ये दहशत निर्माण करू शकतात”, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

Story img Loader