पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु झालं आहे. या युद्धात आत्तापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. तसंच अनेकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. गाझा पट्टीतही हा संघर्ष सुरु झाला आहे. इस्रायलवर प्रचंड अत्याचार सुरु आहेत असे आरोप होत आहेत. अशात पॅलेस्टाईनचे चळवळकर्ते मुस्तफा बारगोती यांना नेमकं काय वाटतं? त्यांच्या दृष्टीने हे सगळं काय सुरु आहे? पॅलेस्टाईनची बाजू काय? या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आहेत. मुस्तफा बारगोती हे पॅलेस्टाईनचे माजी माहिती प्रसारण मंत्री आहेत. त्यांनी नुकतीच CNN ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.
काय म्हटलं आहे मुस्तफा बारगोती यांनी?
“मी डेमोक्रॅटिक पॅलेस्टाईन चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. आम्ही पॅलेस्टाईन डेमोक्रॅटिक इनेशेटिव्ह चालवतो. मात्र आम्ही फतहही नाही आणि हमासही नाही हे मी स्पष्ट करु इच्छितो. हमास आणि आमचा काहीही संबंध नाही. मात्र एक सांगू इच्छितो, इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यांचा हा थेट परिणाम आपल्याला दिसतो आहे.”
५६ वर्षांपासून आम्ही अन्याय सहन करतो आहोत
“१९६७ पासून इस्रायलने पॅलेस्टाईनच्या जमिनीवर कब्जा केला आहे. ५६ वर्षांपासून आम्ही हे सगळं सहन करत आहोत. २०१४ पासून इस्रायल सरकारने पॅलेस्टाईनची साधी दखलही घेतलेली नाही, किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यात रसही दाखवलेला नाही. आज जे घडतं आहे, जे सगळं जग पाहतं आहे ती अनेक घटनांची पार्श्वभूमी असलेली प्रतिक्रिया आहे. पॅलेस्टाईनवर जे हल्ले झाले त्याचा फटका वेगवेगळ्या वीस सामाजिक घटकांना बसला आहे. २४८ पॅलेस्टाईनींची हत्या करण्यात आली आहे. इस्रायल सरकारने जी पावलं उचलली त्यात हे घडलं आहे. पश्चिम किनारपट्टीत या घटना घडल्या. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजावर हे हल्ले करण्यात आले. ज्या २४८ जणांचा मृत्यू झाला त्यात ४० बालकांचाही समावेश होता. नेत्यान्याहू यांच्या आदेशानंतरच या गोष्टी घडल्या. गाझा, जेरुसलेम, पश्चिम किनारपट्टीत या अशाच घटना घडल्या आहेत. ज्यानंतर लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे आणि त्याचेच परिणाम आपण आत्ता पाहातो आहोत. आत्ता जे घडतंय त्यात पॅलेस्टाईनींना हेच वाटतं आहे की आपल्याकडे हा एकच मार्ग उरला आहे, त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे की त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार नेमके कसे मिळणार? पॅलेस्टाईनींना नुसतं दहशतवादी म्हणून काहीही निष्पन्न होणार नाही. आमच्यापुढे प्रश्न हादेखील हा आहे की संयुक्त राष्ट्रांनी युक्रेनची मदत का केली? आमच्याबाबतीतही ते आमच्यावर सातत्याने कब्जा करणाऱ्या इस्रायलच्या बाजूने आहेत.
हमासबाबत काय म्हणाले बारगोती?
हमासकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जातं आहे, त्याबाबत तुमचं म्हणणं काय? हे विचारलं असता बारगोती म्हणाले, “हमासवर हा आरोप केला जातो आहे की ते नागरिकांचे जीव घेत आहेत. मात्र हा आरोप खरा नाही. ते प्रामुख्याने लष्कराच्या छावण्या, त्यांच्या इमारती यांवर हल्ला करत आहेत. तसंच त्यांनी ज्यांना कैद केलंय त्यांच्यातही बहुतांश लोक हे इस्रायल लष्कराशी संबंधित आहेत. इस्रायलनेही आमच्याकडच्या सामान्य माणसांना लक्ष्य केलेलं नाही. पण इस्रायलची विमानं गाझा पट्टीत काय करत आहेत ते तुम्ही पाहू शकता. या विमानांमधून रहिवासी असलेल्या इमारतींवर हल्ले केले जात आहेत. इमारती बॉम्ब हल्ले करुन पाडल्या जात आहेत. आपण रोज बातम्या पाहतो आहोत की या कुटुंबातले नऊ लोक मारले, या कुटुंबातले १० लोक मारले. माझी इच्छा आहे की पॅलेस्टाईनी असोत किंवा इस्रायली कुणीही हे करु नये. मात्र प्रश्न उरतोच की आता हे कोण थांबवणार? तर हे थांबवण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे इस्रायलने आमच्या जमिनींवर कब्जा करणं थांबवावं. तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्ही प्रत्युत्तर देता, मग आमच्यावर कब्जा केला तर आम्ही उत्तर द्यायचं नाही का? शिरीन अवाहके नावाच्या एका शांत स्वभावाच्या पत्रकाराची इस्रायलने हत्या केली. तिला इस्रायलच्या स्नायपरने ठार केलं. त्यानंतर त्या प्रकरणी कुणाला शिक्षा झाली का? कुणाला कोर्टात नेलं गेलं का ? याचं उत्तर नाही असंच आहे. फक्त तीच नाही आत्तापर्यंत ५२ पत्रकारांना ठार करण्यात आलं आहे. अशाच प्रकारे आमच्या (पॅलेस्टाईनी) डॉक्टरांचीही इस्रायलकडून हत्या करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी इस्रायलने थांबवल्या तर आत्ता जे सुरु आहे ते थांबेल. इस्रायलने जे बेकायदा कब्जा करण्याचं धोरण सुरु केलं आहे ते त्यांना थांबवावंच लागेल. तसंच पॅलेस्टाईनींना माणूस म्हणून वागवा. ते देखील तुमच्यासारखेच लोक आहेत, त्यांचा आदर करा. इस्रायलने हे केलं तरच हा संघर्ष थांबण्यास मदत होईल.”
पॅलेस्टाईनी ३० वर्षांहून अधिक काळ अन्यायच सहन करत आहेत
या सगळ्या गोष्टींचा गंभीर परिणाम पॅलेस्टाईनींना भोगावा लागेल असं वाटत नाही का? असं विचारलं असता बारगोती म्हणाले, आम्ही आत्ताही या सगळ्या गोष्टी आणि त्याचे परिणाम सहन करतोच आहोत. वेस्ट बँक भाग हा खिळखिळा झाला आहे तो इस्रायलमुळेच. मागच्या ३० वर्षांपासून आम्ही आमच्या जमिनीवर अन्यायच सहन करतो आहोत. पॅलेस्टाईनींवर हल्ले होत आहेत. इस्रायलचं सरकार हे फॅसिस्ट विचारसरणीचं आहे. आता इस्रायलचं स्वीकारा, निर्वासित व्हा किंवा मरा असेच पर्याय पॅलेस्टाईनींपुढे राहिले आहेत. इस्रायलचे मंत्री अशा पद्धतीची विधानं करत आहेत. मी तुम्हाला सांगतो गाझा पट्टीत यांनी ज्या लोकांना पकडलं आहे, बंधक बनवलं आहे त्यांना जर उद्या सोडलं, आमचे ५ हजारांहून जास्त कैदी त्यांच्या तुरुंगात आहेत. १ हजारांहून जास्त पॅलेस्टाईनी असे आहेत ज्यांना आपल्याला का अटक झाली आहे तेच माहित नाही. या सगळ्यांना इस्रायलने सोडण्याची तयारी दाखवली तर परिस्थिती सुधारू शकते. आमच्यावर त्यांचा कब्जा म्हणजे पॅलेस्टाईनींवर इस्रायलचा कब्जा यातच आमच्या पिढ्यांची हयात गेली. माझे वडील याच वातावरणात राहिले, मी याच वातावरणात राहिलो, माझी मुलगी याच वातावरणात जगते आहे. आम्ही आता स्वतंत्र होण्याची वाट पाहतो आहोत. ३० किंवा ४० वर्षांपूर्वी हमास असा काही प्रकार नव्हता. मात्र आम्हाला तरीही दहशतवादीच म्हटलं गेलं. जो पॅलेस्टाईनी नागरिक त्याच्या स्वातंत्र्यासाठी किंवा हक्कासाठी लढतो त्याला दहशतवादी ठरवलं जातं. त्यामुळे प्रश्न असा आहे की आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याचा अधिकार आहे का? , आम्हाला लोकशाही आणण्यासाठी लढा देण्याचा अधिकार आहे का? इस्रायल आणि संयुक्त राष्ट्र ज्यांना पाठिंबा देत नाहीत अशा लोकशाही पद्धतीच्या निवडणुका आम्हाला घेता येतील का? याची उत्तरं आहेत का कुणाकडे? आम्ही आमच्या हक्कांसाठी लढलो की आम्हाला दहशतवादी ठरवलं जातं. आम्ही जर आत्ता जे करतोय तसं उत्तर दिलं तर आम्हाला हिंसाचार करणारे असं म्हटलं जातं. तुम्ही जर फॉरेनर आहात आणि तुम्ही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलात तर तुम्हाला त्यासाठीही दोषी ठरवलं जातं. मग आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढायचं नाही का? हे सगळं आता संपलं पाहिजे. आम्हाला समान हक्क, शांतता आणि आदरपूर्वक जगण्याचा अधिकार आहे. आता स्वातंत्र्यांची वेळ आली आहे. ते आम्हाला मिळालं तर हिंसा पसरण्याचा काही प्रश्नच येणार नाही असंही बारगोती यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.