पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून भारतात शिरलेल्या पाक सैनिकांच्या तुकडीने भारतीय गस्तदलावर हल्ला करून दोन जवानांची हत्या केली व त्यांचे शिर कापून नेल्याचा खळबळजनक प्रकार काल (मंगळवार) घडल्यानंतर संरक्षणमंत्री ए.के.अॅन्टोनी यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे या कृतीचा तीव्र निषेध नोंदविला आहे. पाकिस्तानी सैन्याचे हे कृत्य निंदनीय आणि अमानीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आमचे सरकार परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, असं पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांनी सांगितले.
संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी म्हणाले की, कालच्या हल्ल्यासंदर्भात भारत सरकार पाकिस्तानकडे आपला निषेध व्यक्त करणार आहे.    
पाकिस्तानी लष्कराची कृती ही अतिशय प्रक्षोभक आहे. ज्याप्रकारे त्यांनी शहीद भारतीय जवानांचे मृतदेह हाताळले ते अमानवीय आहे. आम्ही आमचा निषेध पाकिस्तानकडे नोंदवू आणि डिजीएमओ पाकिस्तानी अधिका-यांसोबत चर्चा करतील. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं अॅन्टोनी  
म्हणाले.   
भारतीय लष्कराचे गस्तिपथक मंगळवारी पुंछ जिल्ह्यातील मानकोटे येथे नियंत्रण रेषेजवळ असताना पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या एका तुकडीने नियंत्रण रेषा ओलांडून १०० मीटर अंतरावर असलेल्या या गस्त दलावर हल्ला केला. यावेळी दोन लान्स नाईक हेमराज व सुधाकर सिंग यांची हत्या करण्यात आली. या दोघांचे शिरही कापून नेण्यात आल्याचे वृत्त आहे. लष्कराने दोन जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांचे शिर कापून नेल्याच्या वृत्तावर त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी, ६ जानेवारी रोजी पहाटे रामपूर भागात पाकिस्तानी सैन्याने अचानक गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात एका पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानने भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण करून या घटनेचा दोष भारतावर टाकला. तसेच भारतीय सैनिकांनी सीमारेषा ओलांडल्याचा दावाही केला. मात्र, भारताने मंगळवारी हा दावा फेटाळून लावला आहे. ‘आमच्या सैन्याने कुठेही सीमारेषा ओलांडलेली नाही. तसेच पाकिस्ताननेही नियंत्रण रेषेचे पावित्र्य जपावे व असे गोळीबार थांबवावेत,’ असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा