गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुझफ्फरनगर दंगलींमधील पीडितांशी पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिस इंटिलिजन्स अर्थात आयएसआयने संपर्क साधल्याचे कोमतेही धागेदोरे, पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे या दंगलींमागे सीमेपलिकडील शक्तींचा हात होता असे ठामपणे म्हणता येत नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. लष्कर ए तय्यबाचे दोन संशयित अतिरेकी दंगलग्रस्तांना भेटून गेले होते, असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केला होता, मात्र तो निराधार असल्याचे या निर्वाळ्यामुळे स्पष्ट झाले.
सरकारी दावे, पोलीस आणि राहुल गांधी
११ डिसेंबर २०१३ रोजी भारतीय संसदेत प्रश्नोत्तरास उत्तर देताना दिलेल्या माहितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी ‘सद्यस्थितीत हाताशी आलेल्या माहितीवरून मुझफ्फरनगर दंगलींमागे आयएसआय, पाकिस्तान आणि दंगलग्रस्तांपैकी काही मुस्लिम युवक यांचा संबंध असल्याचे दिसत आहे’ अशी माहिती दिली होती. तर, एका प्रचारसभेत बोलताना, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘गुप्तचर खात्याचा हवाला देत या दंगलींशी आयएसआयचा हात असल्याचा आणि आयएसआय येथील पीडितांच्या संपर्कात असल्याचे’ म्हटले होते. मात्र आता गृमंत्रालयाच्या दाव्यांमुळे प्रत्यक्ष संसदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिलेली माहितीच चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे पुढे येत आहे.
..त्यांची भेट झाली हे खरेच
आयएसआयचे दोन संशयित येथे दोन तरुणांना भेटले हे खरेच आहे, मात्र ते दोन तरुण मुझफ्फरनगर दंगलींशी संबंधित होते किंवा कसे याबाबत नेमकी माहिती आलेली नाही, असे गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
संपर्क कशासाठी ?
दंगलग्रस्तांशी आयएसआयच्या दोघा संशयितांनी कशासाठी संपर्क साधला असावा याबाबतही तर्कशुद्ध दावे प्रसारमाध्यमांमधून करण्यात आले होते. अशा पीडितांपैकी कोणी दहशतवादी संघटनेसाठी काम करायला तयार आहे का याची चाचपणी करण्यासाठी संशयित तेथे आले असावेत असा दावा सुरक्षा तज्ज्ञांकडून केला जात होता. मात्र, गृहमंत्रालयाच्या मंगळवारच्या खुलाशाने सगळेच संदर्भ बदलले आहेत.
दंगलग्रस्तांना आमिष आणि पक्षांचे आरोप प्रत्यारोप
मुजफ्फरनगर येथील दंगलग्रस्तांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने केल्याच्या संशयावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत जे वक्तव्य केले होते त्याला एका प्रकारे पुष्टी मिळाल्याचे पक्ष सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. तर याची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते शकिल अहमद यांनी ‘आयएसआयला मुस्लिमांना मदत करण्याच्या नावाखाली मुस्लिम देशांकडून पैसे हवे आहेत. तर जिथे जातीय तणाव निर्माण होईल तिथे भाजपला मते मिळतात’ अशी टीका शकिल अहमद यांनी केली. तर, गृहमंत्रालयाने याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, ही घटना पाहता आयएसआयने कसे जाळे पसरवले हे उघड होते, अशी मागणी भाजपने केली आहे.
मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधित खटले मागे घ्या- भाजप
मुझफ्फरनगर दंगलीत सहभाग असलेल्या मुस्लीम नेत्यांवरील खटले मागे घेण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला भाजपने तीव्र हरकत घेतली आहे. राज्य सरकारने याबाबत दाखल करण्यात आलेले सर्वच खटले मागे घ्यावेत, त्यात भेदभाव करू नये आणि यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
दिल्ली पोलिसांचा खटाटोप राहुलना खरे ठरविण्यासाठी?
उत्तर प्रदेशचे मंत्री यांनी दिल्ली पोलिसांचा दावा तथ्यहिन असल्याचे सांगताना हा सगळा खटाटोप केवळ ‘काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केलेले विधान सत्य ठरविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला.
‘लष्कर’च्या त्या दोघांनी दिले ‘कसाब’गँगला प्रशिक्षण
टुंडाचा मुलगा काश्मिरमध्ये ‘लष्कर-ए-तैयबा’साठी कार्यरत
मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांशी ‘आयएसआय’चा संबंध नाही
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुझफ्फरनगर दंगलींमधील पीडितांशी पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिस इंटिलिजन्स अर्थात आयएसआयने संपर्क साधल्याचे कोमतेही धागेदोरे, पुरावे सापडलेले नाहीत.
First published on: 07-01-2014 at 12:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar riot victims echo rahuls claim were approached by lashkar