मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खुब्बापूर या गावातील नेहा पब्लिक स्कूल ही शाळा सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी बंद राहिली. या शाळेतील तृप्ता त्यागी या शिक्षिकेने दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांला गृहपाठ न केल्याची शिक्षा म्हणून एकेक थप्पड मारायला वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सांगितल्याची चित्रफीत शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भरवर्गात वर्गमित्रांकडून मारहाण झालेला मुलगा तणावात, झोपही लागत नसल्याची वडिलांची तक्रार

या प्रकारानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याला उत्तर देण्यात व्यग्र असल्यामुळे शाळा उघडली नसल्याचा खुलासा शाळेच्या व्यवस्थापनाने केला. तसेच मोठय़ा प्रमाणात इतर लोक शाळेला भेट देत असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले. या शाळेला संलग्नतेविषयी, म्हणजेच शाळेची मान्यता रद्द का करू नये अशी विचारणा करणारी, कारणे दाखवा नोटीस शनिवारी बजावण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारचे प्राथमिक शिक्षण अधिकारी शुभम शुक्ला यांनी दिली. शाळेला सोमवापर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या शाळेला २०१९ मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी सरकारी संलग्नतेची मान्यता देण्यात आली होती.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्येच निवडणुका? भाजपाच्या हेलीकॉप्टर्स बुकिंगचा दाखला देत ममता बॅनर्जींचा दावा

या मान्यतेची मुदत गेल्या वर्षी संपली, मात्र व्यवस्थापनाने त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही असे शुक्ला यांनी सांगितले. ही शाळा बंद केली जाणार नाही आणि इतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत सामान्य अध्यापन सुरू राहील, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच देण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर शनिवारी शिक्षिका तृप्ता त्यागी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (जाणीवपूर्वक इजा करणे) आणि कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ही चित्रफीत पूर्ण खरी नसून त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा शिक्षिका त्यागी यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar school where teacher got kids to beat muslim student closed on the third day zws
Show comments