एका रेल्वे प्रवाशाने सतर्कता दाखवत केलेल्या टि्वटमुळे गर्व्हमेंन्ट रेल्वे पोलीस आणि रेल्वे पोलीस फोर्सच्या पथकाला मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्सप्रेसमधून २६ अल्पवयीन मुलींची सुटका करणे शक्य झाले. पाच जुलै रोजी अवध एक्सप्रेसच्या एस ५ डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ट्रेनमध्ये काही मुली रडताना दिसल्या. त्याने लगेच रेल्वेला टि्वट करुन ट्रेनमध्ये २५ मुली रडत असून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अस्वस्थतता दिसत असल्याची माहिती दिली.

त्या टि्वटबद्दल समजल्यानंतर वाराणसी आणि लखनऊ येथील रेल्वे पोलिसांनी झटपट पावले उचलत तपास सुरु केला. गोरखपूर रेल्वे पोलिसांनी लगेच लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला तसेच तस्करी विरोधी पोलीस पथकाला माहिती दिली. अवध एक्सप्रेस कापतागंज रेल्वे स्थानकात पोहोचताच साध्या कपडयातील आरपीएफचे दोन जवान ट्रेनमध्ये चढले.

त्यांना डब्ब्यामध्ये २६ अल्पवयीन मुली दिसल्या. त्यांच्यासोबत दोन जण होते. चौकशी केली असता या सर्व मुली बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यांना नारकटियागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. ज्यावेळी या मुलींना प्रश्न विचारले तेव्हा त्यांना कुठलेही उत्तर ठामपणे देता आले नाही. एकूणच सर्व काही संशयास्पद वाटल्याने या सर्व मुलींना बाल कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या सर्व मुली १० ते १४ वयोगटातील आहेत. या मुलींच्या पालकांना माहिती देण्यात आली असून त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती आरपीएफने दिली.

 

Story img Loader