मॅगीच्या नमुन्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यानंतर मुझफ्फरपूरमधील न्यायालयाने नेसले कंपनीचे अधिकारी आणि उत्पादनाची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २७०, २७२, २७३, २७५, २७६ आणि ४२० नुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर मुझफ्फरपूरमधील काजी मोहम्मदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात यावा आणि गरज पडली तर संबंधितांना ताब्यातही घ्यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मुझफ्फरनगरमधील वकील सुधीरकुमार ओझा यांनी येथील न्यायालयात याचिका दाखल करून कंपनी तसेच अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ही याचिका अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायाधीश रामचंद्र प्रसाद यांनी पोलीसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. कंपनीने आणि ब्रॅण्ड अॅम्बेसेडर यांनी लोकांची दिशाभूल केली असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
माधुरी दीक्षित हिने मॅगीची जाहिरात केली असून, त्यात हानिकारक रसायने सापडल्याने तिला याआधीच हरिद्वारच्या अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जाहिरातीत केलेल्या दाव्यांबाबत ही नोटीस आहे. माधुरी दीक्षित हिने टू मिनिट्स नूडलची जाहिरात केली असून त्यात या नूडलची पोषणमूल्ये जास्त असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे तिने पंधरा दिवसांत त्यावर स्पष्टीकरण करावे, असे हरिद्वारच्या अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

Story img Loader