बहिणीनं आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या एका मित्रानं २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणी आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून आलेल्या दोघांनी तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या तरुणावर आरोपींनी चाकुने वार करत त्याची हत्या केली. मृत पावल्याची पुष्टी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. संबंधित घटना तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील आहे.

पतीची हत्या झाल्यानंतर आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणीनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना तिने सांगितलं की, ‘सुरुवातीपासूनच माझ्या भावाचा आमच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. माझ्या लग्नापूर्वी त्याने मला दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवेन म्हणून भावाने मला दोनदा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला.”

“आम्ही पळून जावून विवाह केला तर माझा भाऊ आम्हाला जीवे मारेल, असा इशारा माझ्या आईनं मला आधीच दिला होता”, असंही पीडित तरुणीने सांगितलं. आमच्या जीवाला धोका आहे, हे माहीत असूनही आम्ही दोघं हैदराबादला पळून गेलो. त्याठिकाणी आम्ही एका मंदिरात विवाह केला. भावानं आमचा शोध घेऊ नये, म्हणून आम्ही आमचे सीम कार्ड फेकून दिले. तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला भेट देऊन संरक्षण देण्याची मागणी केली, असंही पीडितेनं म्हटलं.

एक महिन्यापूर्वी आरोपी भावानं आमचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो शोधू शकला नाही. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी आपल्या पतीसह दुचाकीवरून जात होती. सरूरनगर येथील पंजाला अनिल कुमार कॉलनी परिसरातून जात असताना, आरोपींनी त्यांना आडवलं आणि लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणीनं आपल्या भावाकडे पती मारू नये, यासाठी दया- याचना केली, पण याचा काहीही उपयोग झाला नाही, अशी माहिती पीडित तरुणीनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

Story img Loader