स्टिंग ऑपरेशनद्वारे राजकीय भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणारे ‘तहलका’चे तरुण तेजपाल हे त्यांच्यावरील विनयभंगाचा आरोप झटकण्यासाठी पीडीत सहकारी महिलेच्या कुटुंबियांवर दडपण आणत असल्याची धक्कादायक बाब शनिवारी उघडकीस आल्याने तेजपाल यांना महिला अत्याचारविरोधी कायद्यानुसार तात्काळ अटक करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. विनयभंगाबद्दल गेल्या आठवडय़ात माफीनामा देणारे तेजपाल हे गोव्यात ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता, हे उघड झाल्यानंतर आक्रमक झाले असून आपल्याविरुद्ध कट रचला गेल्याचा आरोप तारस्वरात करू लागले आहेत. गोवा पोलिसांनी मात्र शनिवारी तहलका कार्यालयात थडकून व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चौधरी यांना त्यांचा लॅपटॉप व आयपॉडही देण्यास सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री तेजपाल याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने माझ्या आईची भेट घेऊन दडपण आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडीत तरुणीने केला आहे. या प्रकरणात माझ्या पाठिशी नेमके कोण आहे, मला नेमके काय हवे आहे, असा निर्लज्ज प्रश्न या व्यक्तीने आईकडे केला. तसेच तुम्ही कोणाला वकील म्हणून नियुक्त करीत आहात, असेही विचारले. तेजपाल यांना वाचवणेच तुमच्या हिताचे आहे, असेही सांगून कुटुंबीयांवर दडपण आणले. ही भावी छळसत्राची सुरुवात असावी, अशी भीतीही या तरुणीने व्यक्त केली. दिल्लीत आलेले गोवा पोलिसांचे विशेष पथक या तरुणीचे निवेदन नोंदवून घेणार आहेत. तेजपाल यांच्या अटकेची शक्यता दिल्ली पोलिसांनीही व्यक्त केली आहे. गोवा पोलिसांचे पथक चौकशीसाठी येण्यापूर्वीच शोमा चौधरी यांनी तेजपाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, गोव्यात हा प्रकार घडला त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे लिफ्टमध्ये काय घडले हे कळणे अवघड आहे. इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्या दिवशी केलेले चित्रण मात्र पोलिसांना उपलब्ध झाले आहे. त्यापैकी एका चित्रीकरणानुसार, लिफ्टमधून ही तरुणी वेगाने बाहेर येत पळताना दिसत आहे.
‘ऑपरेशन तहलका’
९.०० गोवा पोलिसांचे खास पथक दिल्लीकडे रवाना.
११.३० गोवा पोलीस पथक दिल्लीत दाखल.
१.०० सीसीटीव्ही फूटेज नाही : पोलिसांची कबुली.
१.४५ शोमा चौधरी यांची प्रारंभिक चौकशी पूर्ण.
४.५५ तहलका कार्यालयात चौकशी सुरू.
६.५५ तपासात सहकार्य : तेजपाल
यांच्या वकिलांची ग्वाही.
७.५० तेजपाल यांच्याकडून दडपण आणले जातअसल्याचा पीडीत तरुणीचा गौप्यस्फोट.
पहिला राजीनामा
या सर्व प्रकरणात शोमा चौधरी या तरुण तेजपाल यांनाच वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप तहलकाच्या कर्मचारी रेवती लाल यांनी केला आहे. या प्रकरणाची घृणा वाटत असल्याचे नमूद करीत रेवती यांनी २० नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला असून त्याच दिवशी चौधरी यांनी तो स्वीकारला आहे.
तेजपतन..
स्टिंग ऑपरेशनद्वारे राजकीय भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणारे ‘तहलका’चे तरुण तेजपाल हे त्यांच्यावरील विनयभंगाचा आरोप झटकण्यासाठी पीडीत सहकारी
First published on: 24-11-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My family is being intimidated says tehelka sexual assault victim