नरेंद्र मोदी यांची आसाममधील प्रचारात भूमिका; राज्याच्या विकासासाठी त्रिसूत्री
आसामचा अतिजलद आणि र्सवकष विकास करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्यातील जनतेला दिले. आपली लढाई ही मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरोधातील नाही तर गरिबी, भ्रष्टाचार आणि काँग्रेसच्या राजवटीत राज्याच्या झालेल्या अधोगतीविरोधात आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मोदी यांनी शनिवारी येथे फोडला. विकास, अतिजलद विकास आणि र्सवकष विकास ही आपली त्रिसूत्री आहे, असे मोदी एका निवडणूक सभेत म्हणाले. यापूर्वीच्या सरकारपेक्षा आपल्या सरकारने आसामच्या पायाभूत सुविधांसाठी अनेकदा अधिक निधी उपलब्ध करून दिल्याचा दावाही या वेळी मोदी यांनी केला.
आसाममधील निवडणूक ही आपल्यातील आणि मोदी यांच्यातील थेट लढाई असल्याचा दावा गोगोई यांनी केला, त्यावर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, वयाने मोठे असलेल्या नेत्याबद्दल आदर आहे. आसामचे मुख्यमंत्रिपदाचे भाजपचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांची मोदी यांनी स्तुती केली. आपल्या मंत्रिमंडळातील ते सर्वोत्तम मंत्री आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
तरुण गोगोई काही वर्षांँतच वयाची नव्वदी गाठतील तरीही त्यांची लढत आपल्याशी आहे असे ते म्हणतात, गोगोई आपण ज्येष्ठ आहात, तुमच्या तुलनेत आपण कितीतरी तरुण आहोत, तुमच्याबद्दल आपल्याला आदर आहे, तरुण ज्येष्ठांशी लढत नाहीत तर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात, असे मोदी म्हणाले.
सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री झाले तर ते आपल्यासाठी आणि सरकारसाठी तोटय़ाचे आहे, कारण ते क्षमता असलेले अत्यंत साधे मंत्री आहेत, असे मोदी म्हणाले. आसाममध्ये केवळ एकच ‘आनंद’ आहे आणि तो म्हणजे सर्वानंद, असेही पंतप्रधान म्हणाले. तथापि, मोदी यांनी आपल्या भाषणात घुसखोरीच्या प्रश्नाचा उल्लेख केला नाही, मोदींचा भर विकास आणि आसामची अधोगती यावरच होता. काँग्रेसची राजवटच या स्थितीला जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.
आसाममधील जनतेने आपल्याला, सर्वानंद यांना पाच वर्षे द्यावीत, भाजप आणि त्यांचे घटक पक्ष आसामला समस्येतून बाहेर काढतील, असेही पंतप्रधान म्हणाले.

Story img Loader