पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नुकताच जामीन मिळाला आहे त्यामुळे ते तुरुंगाबाहेर आहेत. आता इम्रान खान यांच्यावर घरात दहशतवाद्यांना थारा दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या घरात ३० ते ४० दहशतावादी लपले आहेत. २४ तासांत त्यांना सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं नाही तर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या रेंजर्सनी इम्रान खान यांच्या घराला घेराव घातला आहे. याविषयी इम्रान खान यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
काय म्हटलं आहे इम्रान खान यांनी?
मला अटक करण्याच्या बहाण्याने माझ्या हत्येचा कट रचला जातो आहे. माझ्या घराला घेराव घातला गेला आहे. काहीही घडलं तर जबाबदारी पाकिस्तानी लष्कराची असेल असं म्हणत इम्रान खान यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कदाचित हे माझं शेवटचं ट्वीट
माझ्या अटकेच्या बहाण्याने माझ्या हत्येचा कट रचला जातो आहे. कदाचित मी ट्वीट करत असलेलं हे शेवटचं ट्वीट आहे. असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये अराजक माजलं आहे. जर ते वेळेत नियंत्रणात आणलं गेलं नाही तर हा देश अशा ठिकाणी पोहचेल जिथून परतता येणार नाही. मला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर ११ मे रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जेव्हा इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी देशभरात आंदोलन केलं. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला.