महिलांसारखे राहणे पसंत करणा-या पतीविरोधात पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘माझा पती दररोज रात्री महिलांसारखा मेकअप करतो आणि साडी नेसतो’ अशी तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली आहे, मला पतीपासून विभक्त व्हायचे आहे असे या महिलेने म्हटले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बंगळुरुत राहणारी २९ वर्षीय महिला सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. इंदिरानगरमध्ये राहणा-या या महिलेचे  एक वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. कुटुंबीयांनीच तिच्यासाठी वर शोधला होता. महिलेचा पतीदेखील सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझा पती साडी नेसून झोपला होता. हे चित्र बघून मला धक्काच बसला असे या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लग्नाला एक वर्ष होत आला तरी माझ्यात आणि पतीमध्ये कोणतेही संबंध निर्माण होऊ शकले नाही. माझा पती दररोज सकाळी ऑफीसमध्ये पुरुषासारखा शर्ट पँट घालून जातो. पण रात्री घरी परतल्यावर तो साडी नेसतो आणि महिलांसारखा मेक अपही करतो असे तिने म्हटले आहे.

पोलिसांनी महिलेची तक्रार महिला तक्रार निवारण केंद्राकडे वर्ग केली. केंद्रात समुपदेशन करणा-या तज्ज्ञांनी पती -पत्नीचे समुपदेशनही केले. यादरम्यान पतीनेही तिला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.