Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यसभा आणि लोकसभेतही उमटले, दरम्यान एका मुलाची खंत समोर आली आहे. त्याला आता कुंभमेळ्यात मृत्यू झालेल्या आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी वणवण करावी लागते आहे.
नेमकं काय घडलं?
धनंजय कुमार गोंड या बिहारच्या २४ वर्षीय मुलाच्या आईचा कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. धनंजय कुमार गोंड या बिहारच्या गोपाळगंजचा रहिवासी आहे. त्याला त्याच्या आईचं मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर कार्यालयांमध्ये वणवण करावी लागते आहे. धनंजय कुमार प्रयागराजहून त्यांच्या घरी परतले आहेत. मात्र आता मृ्त्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते आहे.
आईचं मृत्यूप्रमाणपत्र कोण देणार याबाबत स्पष्टता नाही
आईचं मृत्यू प्रमाणपत्र कोण देईल? कुठल्या कार्यालयातून मिळेल? हे माहीत नसल्याने धनंजय संभ्रमात आहेत. ज्यांनी कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत आपली कुटुंबं गमावली त्यापैकी एक धनंजय आहेत. मात्र आता आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी धनंजय यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र ज्या ३० जणांचा मृत्यू झाला आहे त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. धनंजय म्हणाला की गोपालगंज येथील पोलिसांनी मला मृत्यू प्रमाणपत्र आणण्यास सांगितलं. मात्र ते कुठून मिळेल याबाबत काहीही स्पष्टता नाही. दोन दिवस झाले आहेत मी काय करायचं याच विवंचनेत आहे.
एकमेकांवर जबाबदारी कशी ढकलली जाते आहे?
प्रयागराज जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे की अलाहाबाद छावणी बोर्ड मृतांची यादी जाहीर करेल. तर छावणी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद समीर इस्लाम यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सध्या जमीन कुंभ प्रशासनाला दिली आहे त्यामुळे मृतांची यादी जाहीर करणं ही त्यांची जबाबदारी आहे. कुंभमेळाच्या अतिरिक्त मेळा अधिकारी म्हणाले मृत्यू प्रमाणपत्र महापालिका प्रशासनातर्फे देण्यात येईल. तर प्रयागराजचे महापालिका आयुक्त अंबरीश कुमार बिंद यांनी म्हटलं आहे जबाबदारी आमची नाही. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बिंद यांनी ही माहिती दिली आहे.
रुग्णालयाने काय म्हटलं आहे?
दरम्यान बिंद यांनी असं सांगितलं आहे की मृत्यू प्रमाणपत्रं देणं हे रुग्णालय प्रशासनाकडून दिलं जाईल. तर स्वरुप रानी नेहरु रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. ए. के. सक्सेना म्हणाले की मृत्यूप्रमाणपत्र देण्याची जबाबादारी कुणाची आहे माहीत नाही पण रुग्णालय असं प्रमाणपत्र देणार नाही.