माझा पाठलाग करणाऱया माध्यमांच्या प्रतिनिधींनाच माझा राजीनामा हवा आहे, अशी खोचक टिप्पणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सोमवारी चेन्नईमध्ये केली. 
कोलकात्यातील आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर श्रीनिवासन सोमवारी सकाळी चेन्नईला पोहोचले. यावेळी विमानतळावर असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, माध्यमांचे प्रतिनिधी माझा सारखा पाठलाग करताहेत. मी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये सर्व विषयांवर खुलासा केलाय. आता राजीनामा देण्याचे काहीच कारण नाही.
श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीच्या आरोपावरून अटक केलीये. अभिनेता विंदू दारा सिंग यांने पोलिस जबाबात मयप्पन सट्टेबाजी करीत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर मयप्पन यांना अटक करण्यात आली. मयप्पन यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवासन राजीनामा देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे श्रीनिवासन यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते.