‘माझ्या मुलाला अटक झाली हे खूप बरे झाले. बनावट चकमकीत त्याची हत्या व्हायची या भीतीतून तरी मुक्तता झाली. यासिन चुकला असेल तर त्याला कायद्याने शिक्षा जरूर मिळाली पाहिजे. मात्र, प्रसिद्धीमाध्यमांनी त्याचा न्यायनिवाडा करू नये..’ ही प्रतिक्रिया आहे यासिन भटकळचे वडील झरार सिद्दिबापा यांची. यासिनच्या अटकेनंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना पाठवलेल्या पत्रकात ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील भटकळ याच गावात यासिन दहावीपर्यंत शिकला, मात्र त्याला दहावी काही उत्तीर्ण होता आली नाही. २००५ मध्ये तो दुबईला गेला.
तेथून २००७ पासून तो गायबच झाला. त्याच्या शोधासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. परंतु तो सापडला नाही. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटात त्याचे नाव आले. मात्र, त्याने पुणे कधी पाहिलेही नव्हते. यासिन तेव्हापासून आमच्यापासून दुरावला ते आजतागायतच. आता त्याला अटक झाली हे प्रसिद्धीमाध्यमांमधून समजले. त्याच्या अटकेमुळे हायसे वाटले… पोलिसांच्या बनावट चकमकीत यासिन भटकळ ठार झाला या भीतीतून तरी आमची सुटका झाली, असे झरार यांनी या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. देशातील न्यायसंस्थेवर आपला विश्वास असून सर्व प्रकरणांत यासिन दोषी आढळला तर त्याला नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. फक्त प्रसारमाध्यमांनी त्याचा न्यायनिवाडा करू नये अशी विनंतीवजा आग्रह झरार यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. या पत्रकावर यासिनचे काका याकुब यांचीही स्वाक्षरी आहे.

Story img Loader