रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया हे त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानियांना दिलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया मारहाण करत असल्याचंही वक्तव्य केलं होतं. या वादात आता गौतम सिंघानियांचे वडील आणि रेमंडचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांची एंट्री झाली आहे. त्यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला आहे असंही विजयपत सिंघानिया म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयपत सिंघानिया काय म्हणाले?

“मला रस्त्यावर आणून गौतम सिंघानियाला आनंद झाला. २०१५ मध्ये मी रेमंडची जबाबदारी त्याला दिली. मात्र मी सगळं काही त्याच्या नावे करायला नको होतं. तो माझा मूर्खपणाचा निर्णय होता. मला रस्त्यावर आणून त्याला (गौतम सिंघानिया) आनंद झाला.” असं विजयपत सिंघानिया म्हणाले. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया यांनी हे भाष्य केलं आहे.

मुलांच्या नावे सगळी मालमत्ता आणि संपती करणाऱ्या आई वडिलांनी विचार करावा

विजयपत सिंघानिया म्हणाले, “जे आई वडील आपल्या मुलांना सगळं काही देतात, आपली सगळी संपत्ती, मालमत्ता त्यांच्या नावे करतात त्यांनी आधी चारदा विचार केला पाहिजे.” गौतम सिंघानिया हे त्यांच्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. गौतम सिंघानिया यांची चर्चा २०१७ मध्येही झाली होती. कारण त्यावेळी त्यांनी त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांना रेमंड हाऊस या दक्षिण मुंबईतल्या घरातून हाकलून दिलं होतं. १३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी नवाज आणि मी वेगळे होत आहोत अशी घोषणा गौतम सिंघानिया यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केली होती. त्याचवेळी नवाज मोदी यांना रेमंड हाऊसच्या दिवाळी पार्टीत येऊ दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

हे पण वाचा- कोण आहेत नवाज मोदी? गौतम सिंघानियांपासून विभक्त झाल्याने आहेत चर्चेत

तर मी खरंच रस्त्यावर आलो असतो…

“मला माझ्या मुलाने घरातून हाकलून दिलं. मला रस्त्यावर आणलं ते पाहून त्याला आनंद झाला. मात्र नंतर त्याने सांगितलं होतं की कंपनीचा काही भाग तो माझ्या नावे करणार आहे. मात्र ते आश्वासनही हवेत विरलं. मी त्याला सगळे अधिकार देऊन चूक केली. मात्र एक बरं झालं की माझ्याकडे पैसे होते, आता त्याच पैशांवर आपल्याला आयुष्य काढायचं आहे हे मी स्वतःला समजावलं आणि मी यातून बाहेर पडू शकलो. ते पैसेही मी त्याला दिले असते तर मी खरंच रस्त्यावर आलो असतो. मी त्याला (गौतम सिंघानिया) जन्म दिला आहे, त्याचा पिता आहे. जर तो मला घराबाहेर हाकलू शकतो तर त्याच्या पत्नीलाही घराबाहेर हाकलू शकतो” असंही विजयपत सिंघानिया म्हणाले.

नवाज मोदी यांनी घटस्फोटाच्या बदल्यात तडजोड म्हणून गौतम सिंघानियांच्या संपत्तीचा ७५ टक्के भाग मागितला आहे. त्यावर विचारलं असता विजयपत सिंघानिया म्हणाले, “हिंदू विवाह कायद्यानुसार जर पती पत्नी विभक्त झाले तर पत्नीचा पतीच्या ५० टक्के संपत्तीवर हक्क असतो. नवाजला जर ५० टक्के संपत्ती हवी असेल तर तिला कोर्टात जाण्याची गरज नाही. मात्र गौतम सहजासहजी तिच्या अटी मान्य करणार नाही. प्रत्येकाला विकत घ्यायचं हाच त्याचा आदर्श आहे. तो माझ्याशीही असंच वागला आहे.” असं विजयपत सिंघानिया म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My son will be happy to see me on road vijaypat singhania on raymond boss gautam singhania scj