विजय मल्ल्याची बाजू घेणारं वक्तव्य केल्याने टीका होऊ लागल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. एखादा दुर्मिळ आर्थिक अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यवसायिकाला घोटाळेबाज म्हणणं योग्य नाही. विजय मल्ल्याने विमान कंपनीत आलेल्या अडथळ्यांमुळे कर्ज फेडलं नाही म्हणून लगेच त्याच्यावर घोटाळेबाज म्हणून शिक्का मारणं योग्य नाही असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
विजय मल्ल्याला फ्रॉड म्हणणं योग्य नाही – नितीन गडकरी
‘मी म्हणालो होती की, जर विजय मल्ल्याने काही चूक केली असेल आणि त्याच्याविरोधात तपास सुरु असेल तर तपास योग्य आहे’, असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘मी असंदेखील म्हणालो होतो की, विजय मल्ल्याचं खातं 40 वर्षांतील सर्वात महत्त्वाचं खातं होतं. 41 व्या वर्षी त्याला समस्या आल्या. व्यवसायात चढ उतार होत असतात. माझ्या दोन्ही वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला’.
काय बोलले होते नितीन गडकरी –
’40 वर्ष विजय मल्ल्या नियमित पैसे फेडत होता, त्यावरील व्याजही भरत होता. 40 वर्षांनी जेव्हा तो एव्हिएशनमध्ये गेला आणि त्यानंतर तो अडचणीत आला तर एकदम चोर झाला ? जे पन्नास वर्ष व्याज भरत होता ते ठीक आहे. पण एकदा त्याने नाही भरलं तर लगेच घोटाळेबाज झाला ? ही मानसिकता योग्य नाही’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
नितीन गडकरी यांनी प्रत्येक व्यवसायात जोखीम असते असं म्हटलं. जर ग्लोबल रिसेशन किंवा अंतर्गत समस्यांमुळे अडचण आली असेल तर त्या संबंधित व्यक्तीला मदत केली पाहिजे असंही नितीन गडकरी बोलले.
गडकरींनी सुरुवातीलाच आपला विजय मल्ल्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले की, ‘जर मल्ल्याने घोटाळा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे’. ‘पण जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल आणि आपण त्याच्यावर घोटाळेबाज म्हणून ठपका ठेवला तर अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही’, असंही गडकरी बोलले आहेत. ‘एका चुकीची परवानगी सर्वांना असली पाहिजे. आजकाल प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक माणूस चोर आहे, असं नाही झालं पाहिजे’, असं मत गडकरींनी व्यक्त केलं.