अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश प्रीतिंकर दिवाकर यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कॉलेजिअमच्या एका निर्णयाविरोधात भाष्य केलं आहे. दिवाकर यांचा दावा आहे की, २०१८ मध्ये छत्तीसगड हायकोर्टातून अलहाबाद हायकोर्टात झालेली बदली चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती. त्यांना त्रास देण्याकरता ही बदली करण्यात आली होती, असंही ते म्हणाले. लाईव्ह लॉ या कायदेशीर वृत्त देणाऱ्या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रीतिंकर दिवाकर हे अलाहाबद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. ते नुकतेच या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. २०१८ मध्ये छत्तीसगड हायकोर्टातून अलहाबाद हायकोर्टात त्यांची बदली होती. परंतु, ही बदली अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच, या बदलीमागचं कारणही त्यांना अद्याप कळलेलं नसल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “मी इशारा दिला तर..”, पोलीस अधिकाऱ्याला AIMIM नेत्यानं भरसभेत धमकावलं; म्हणाले “चाकू आणि…”

प्रीतिंकर दिवाकर यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही बदली झाल्याचा दावा त्यांनी केला असला तरीही त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं आहे. ते म्हणाले की, ही बदली माझ्यासाठी सकारात्मक ठरली. कारण इथल्या इतर सहकाऱ्यांनी प्रचंड सहकार्य केलं आणि प्रेम दिलं.

तसंच, यावेळी त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचेही आभार मानले. अलहाबाद हायकोर्टात मुख्य न्यायाधीशपदाची सूत्रे सांभाळण्याची शिफारस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कॉलेजिअने केली होती, असं ते म्हणाले. तसंच, “जीवन एक परीक्षा आहे, परिणाम नाही. आपले कर्म आपलं जीवन ठरवतो, ही खरी गोष्ट आहे. चांगली कामे नेहमीच आपली छाप सोडतात”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं. तसंच, त्यांच्यावर झालेले अन्याय चंद्रचूड यांनी दूर केले, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My transfer to allahabad high court by collegium in 2018 was ill intended to harass me retiring cj pritinker diwaker sgk