Gwalior Man Protest: उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने प्रियकर साहिल शुक्लासह मिळून पती सौरभ राजपूतची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये कोंबले आणि त्यावरून काँक्रिट ओतले. या हत्याकांडाची चर्चा देशभरात झाली. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनीही या निळ्या ड्रमची दहशत पसरली असल्याचे विनोदाने म्हटले होते. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये एका पतीनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात आंदोलन करत मेरठ प्रकरणासारखा आपलाही खून केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
ग्वाल्हेरच्या अमित कुमार सेन नावाच्या इसमाने त्याची पत्नी आणि प्रियकरापासून जीवाला धोका असल्याचा आरोप करत आंदोलन केले आहे. माझ्या मुलाचा त्या दोघांनी खून केला आहे, असाही आरोप अमित कुमार सेनने केला आहे. पोलिसांकडे अनेकदा तक्रार केली, मात्र माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही, असाही दावा अमित कुमार सेनने केला आहे.
३८ वर्षीय अमित कुमार सेनने यांनी मुख्यमंत्र्यांना संबोधित करणारा संदेश लिहून हातात कागद धरून आंदोलन केले. “माझ्या पत्नीने मला दगा दिला. माझ्या मुलाला मारून टाकले गेले. ती मलाही मारू शकते”, असा संदेश लिहून पत्नीवर कारवाई करण्याची मागणी अमित कुमार सेनने केली आहे. मेरठसह अलीकडेच देशात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, जिथे पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली आहे.
माझ्या पत्नीचे तीन ते चार प्रियकर आहेत, असाही दावा अमित कुमार सेनने केला आहे. तसेच पत्नी आणि प्रियकराने मिळून आमचा मुलगा हर्षची हत्या केली. आता त्यांचे पुढचे लक्ष्य मीच आहे. माझी पत्नी राहुल नामक इसमाबरोबर राहत आहे. त्यांनी आमच्या छोट्या मुलाला स्वतःसह नेले आहे, असेही तो म्हणाला.
ग्वाल्हेरच्या फूलबाग चौकात सदर आंदोलन करण्यात आले. पोलिसांकडे अनेकदा तक्रारी दिल्या. पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा अमितचा दावा आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मला संरक्षण द्यावे, अशी मागणी अमितने केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. परंतु यापुढे तक्रार झाल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल.