Anand Mahindra Reaction on L&T Chairmans 90-hour workweek suggestion: इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे ७० तास काम करण्याचा सल्ला काही काळापूर्वी दिला होता. त्यानंतर लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वी केले होते. एकाबाजूला कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्याचा ताळमेळ (वर्क लाईफ बॅलन्स) साधण्यात कर्मचाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत असते. त्यातून ताण-तणाव निर्माण होत असतो. यातच कॉर्पोरेट नेत्यांनी अशाप्रकारची विधाने केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर या सल्ल्याचा निषेध केला. आता प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही यावर सडेतोड आणि उपरोधिक भाष्य केले आहे. कामाच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला अधिक महत्त्व दिले पाहीजे, असे ते म्हणाले आहेत.

दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५’ या संमेलनाला संबोधित करत असताना आनंद महिंद्रा यांनी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानावर भूमिका मांडली. पत्रकार पालकी शर्मा यांनी आनंद महिंद्रा यांना ते किती तास काम करतात? असा प्रश्न विचारला. त्यावर आनंद महिंद्रा म्हणाले, “मी हे नेहमी टाळत आलो आहे. माझ्यासाठी किती तास काम केले, हे महत्त्वाचे नाही. मला कामाच्या दर्जाबाबत विचारा. त्यामुळे किती तास काम केले, त्यापेक्षा कोणत्या दर्जाचे काम झाले, हे महत्त्वाचे आहे.”

हे वाचा >> रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

आनंद महिंद्रा पुढे म्हणाले, “मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते, ही चर्चा चुकीच्या दिशेला जात आहे. कामाच्या दर्जावर आपण अधिक चर्चा करायला हवी. त्यामुळे ४० की ४८ किंवा ७० की ९० तास केले, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही १० तास चांगले काम करू शकत असाल तर त्यातूनही जग बदलता येते.”

‘मला बायकोला पाहत बसणं आवडतं’

‘कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले पाहीजे. किती वेळ तुम्ही पत्नीला पाहत बसणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले तर मला आनंद होईल’, असे विधान लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी केले होते. यावर उपरोधिक टोला लगावताना आनंद महिंद्रा म्हणाले, “मी सोशल मीडियावर सक्रिय असतो, याचा अर्थ मी मोकळा आहे, असे अजिबात नाही. माझी पत्नी छान आहे, तिला पाहत बसायला मला आवडतं. मी सोशल मीडियावर मित्र यादी वाढवायला आलेलो नाही. सोशल मीडिया हे एक उत्तम बिझनेस टुल आहे, म्हणून मी त्याचा वापर करतो. मला असंख्या लोकांकडून सूचना प्राप्त होतात.”

Story img Loader