Myanmar Earthquake Death Toll : म्यानमार व थायलंडमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपाचं केंद्र म्यानमारमध्ये असल्याने या देशात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. शेकडो इमारती कोसळल्या आहेत, हजारो घरं ढासळली आहेत. या भूकंपानंतर बाधित परिसरात बचाव मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. बचाव पथकातील हजारो कर्मचारी व लष्कराचे जवान गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत शेकडो लोकांना त्यांनी डेब्रिजखालून सुखरूप बाहेर काढलं आहे. तसेच अनेक मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहेत.
म्यानमारमधील लष्करी सरकारने सांगितलं आहे की या भूकंपात १,७०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३,५१४ नागरिक जखमी झाले आहेत, तर १५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मात्र, तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की या भूकंपात २,०२८ जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्या ३,६०० हून अधिक आहे.
म्यानमार सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल जॉ मिन तुन यांनी सरकारी वृत्तवाहिनी एमआरटीव्हीला सांगितलं की “या भूकंपात ३,४०० जण जखमी झाले आहेत. तर १,६४४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. याचबरोबर ३०० हून अधिक जण बेपत्ता असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.”
सरकारचं अपयश
म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या मंडालेपासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे लागोपाठ सात हादरे बसले, त्यापैकी ७.७ (रिष्टर स्केल) तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार व थायलंडमध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. दुभंगलेले रस्ते, उखडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असं चित्र भूकंपग्रस्त भागांत दिसत आहे. म्यानमारमधील लष्करशाहीने भूकंपानंतर सहा प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली आहे. येथील लष्करशाही सरकार लोकांना वाचवण्यात, सुनियोजित बचाव मोहिमा आखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका आंतरराष्ट्रीय पातळीवरून होऊ लागली आहे.
७.७ रिष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची खोली फार नसल्यामुळे त्याची तीव्रता अधिक होती. पहिल्या ७.७ रिष्टर स्केलच्या भूकंपापाठोपाठ ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. या भूकंपानंतर म्यानमार व थायलंडने देशात आणीबाणी जाहीर केली. म्यानमारला लागून असलेल्या चीनच्या नैऋत्य युनान प्रांतातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भागात थोडी वित्तवाहानी झाली आहे. यासह भारताच्या पश्चिम बंगाल, मणिपूर या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. बांगलादेशातील भूकंपाचे धक्के बसले.