Myanmar Air strike on Let Pan Hla village : म्यानमार हा आपला शेजारी देश २०२१ पासून पुन्हा लष्करशाहीच्या ताब्यात गेला आहे. तेव्हापासून तिथे अस्थैर्य आहे. लोकशाही समर्थक लोकांचे गट लष्करशाहीशी प्राणपणाने लढत आहेत. या गटांनी अनेक गावे आपल्या निंयत्रणात आणली असून अशाच एका गटाच्या निंयत्रणात असलेल्या गावावर म्यानमारच्या लष्कराने शुक्रवारी सायंकाळी (१४ मार्च) हल्ला केला. या हल्ल्यात सहा मुलांसह एकूण ३० जण ठार झाले आहेत. हे गाव मंडाले शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.

म्यानमारच्या लष्कराने सशस्त्र बंडखोरांच्या (लोकशाही समर्थक) ताब्यात असलेल्या गावावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. म्यानमारमधील ऑनलाइन माध्यमांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मंडाले पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने सांगितलं की मंडाले शहराच्या उत्तरेस ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगू शहरातील लेट पान या गावावर हा हल्ला करण्यात आला. मंडाले हे म्यानमारमधील दुसरं सर्वात मोठं शहर आहे.

ज्या गावावर हा हल्ला झाला ते गाव जुंटाविरोधी गट एमडीवाय-पीडीएफच्या ( Mandalay People’s Defence Force) निंयत्रणात आहे. या हल्ल्यानंतर एमडीवाय-पीडीएफने म्हटलं आहे की जुंटा सैन्न्याने गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात सहा लहान मुलांसह २७ लोकांचा बळी गेला आहे. एमडीवाय-पीडीएफने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली आहे.

चार वर्षांपासून म्यानमार लष्करशाहीच्या ताब्यात

जग करोनातून सावरत असताना १ फेब्रुवारी २०२१ रोजी म्यानमारमधील लष्कराने आंग सान सून ची की यांचं सरकार पाडलं आणि देशाची सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर देशभर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. परंतु, शांततेच्या मार्गाने झालेली ही निदर्शने तिथल्या लष्करशाहीने दडपली. त्यानंतर लोकांनी शस्त्रे हाती घेतली. देशभर लोकशाही समर्थक सशस्त्र बंडखोरांचे गट तयार झाले असून त्यांचा लष्कराशी संघर्ष चालू आहे. या गटांनी देशभरातील छोटी-छोटी गावे ताब्यात घेतली असून अशाच एका गावावर लष्कराने शनिवारी हवाई हल्ला करून आपल्याच नागरिकांना ठार केलं.

लष्करशाहीविरोधात बंडखोरांची वाढती ताकद

म्यानमारमध्ये शस्त्रबळ लष्कराकडे असल्यामुळे तांत्रिकदृष्टया विरोध चिरडण्याची ताकदही लष्करशाहीकडे आहे. पण तरीही लष्करशाही खचत असल्याचे दिसते, याचे कारण बर्मी समाज बदलतो आहे. देशातील तरुणांनी लष्करशाहीविरोधात शस्त्रे हाती घेतली आहेत. म्यानमारच्या राजकीय क्षेत्रावर प्रभाव असलेल्या बौद्ध भिख्खूंनी देखील लष्करशाहीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांचा आवाज क्षीण असला तरी ते लष्करशाहीविरोधात बंडखोरांना मदत पुरवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवून देऊ पाहत आहेत.

Story img Loader