म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या दहशतवादी गटाने गेल्या वर्षी ५३ हिंदुंची हत्या केली होती, असा अहवाल अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने दिला आहे. या अहवालामुळे म्यानमारमधील हिंसाचाराचे भीषण रुप पुन्हा एकदा समोर आले आहे. बीबीसीनं हे वृत्त दिलं असून गेल्या वर्षी एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या व म्यानमारच्या सैन्यानं फेटाळलेल्या या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे.
म्यानमारमधील रखाइन प्रांतातील खा माँग सेक या खेड्यात २५ ऑगस्ट २०१७ रोजी ‘अकारान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मी’च्या दहशतवाद्यांनी हिंदूंची सामूहिक कत्तल केली. काळ्या कापडाने चेहरे झाकलेल्या दहशतवाद्यांनी हिंदूबहुल गावावर हल्ला केला होता. गावातील ५३ जणांना दहशतवाद्यांनी पर्वताकडे नेले. यानंतर त्यांच्यावर निर्दयपणे कोयत्याने वार करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह तीन मोठ्या खड्ड्यांमध्ये फेकून देण्यात आले होते.
गेल्या वर्षी एएफपी या वृत्तसंस्थेने सर्वप्रथम यासंबंधीचे वृत्त दिले होते. मात्र, म्यानमारमधील सैन्याने हा दावा फेटाळून लावला होता. आता अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. अॅम्नेस्टीच्या अहवालात आठ प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती देखील आहे. तसेच याच भागातील आणखी एका गावातील सुमारे हिंदू समाजातील सुमारे ४६ जण अजूनही बेपत्ता असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यांची देखील सामूहिक कत्तल करण्यात आली असावी, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
“या अत्यंत निर्घृण हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने हिंदूंना पकडण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्याच गावामध्ये त्यांची हत्या करण्यात आली,” असे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं की, “त्या रोहिंग्या मुस्लीम दहशतवाद्यांनी पुरूषांची कत्तल केली. त्यांच्याकडे चाकू, लोखंडी सळया होत्या. आम्ही झुडुपात लपलो होतो. माझे वडील, भाऊ, काका सगळ्यांची हत्या करण्यात आली.”