अमेरिका आणि चीनदरम्यान स्पाय बलूनवरुन राजकारण तापले असतानाच आता जपानच्या शिजुओका प्रांतातील हमामात्सु शहराच्या एंशुहामा समुद्रकिनाऱ्यावर एक ‘चेंडू’सदृश्य धातूचा गोळा सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दीड मीटर व्यास असलेला हा गोळा मातीने माखलेला आहे. या आकाराचा चेंडूसदृश्य गोळा आजवर कुणीही पाहिला नव्हता. हा मोठा चेंडू विचित्र असल्यामुळे हमामात्सु शहरातील लोकांना एंशुहामा समुद्रकिनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या चेंडूची आता बॉम्ब विरोधी पथकाकडून पडताळणी करण्यात येत आहे. जपानच्या सेल्फ डिफेंस फोर्सला याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मात्र अद्याप हा चेंडूसदृश्य गोळा इथे कसा पोहोचला? नक्की यामध्ये काय आहे? याचा तपास लागू शकलेला नाही. वरकरणी ही वस्तू समुद्रातील सुरुंगाप्रमाणे भासत असली तरीही याचा आकार सुरुंगापेक्षाही मोठा असल्याचे सांगितले जाते.

जपानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळ्याचा व्यास दीड मीटर (4.9 फूट) इतका आहे. हा गोळा धातूचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना धातूचे हुक देखील आहेत. स्थानिक रहिवाशी समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना त्यांना हा गोळा पहिल्यांदा दिसला. मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी स्थानिकांना याठिकाणी प्रवेशबंदी करुन पुढील तपास सुरु केला आहे. हा धातूचा गोळा दुसऱ्या महायुद्धातील एखादा बॉम्ब असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे, मात्र या दाव्याची खातरजमा अद्याप झालेली नाही. लोक तर याला एलियन्सची उडती तबकडी असावी, असेही म्हणत आहेत.

जपानी नौदल आणि कोस्ट गार्ड सक्रिय

जपानी माध्यम आउटलेटने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तज्ज्ञांचा चमू पोहोचला आहे. या गोळ्याचे फोटो जपान सेल्फ डिफेंस आणि कोस्ट गार्डला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत जपान सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जपानमधील नागरिकांमध्ये या गोळ्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, शत्रू राष्ट्रांची ही काहीतरी खेळी असावी तर काहींना वाटतंय की एलिएन्स पुन्हा पृथ्वीवर आले असावेत. एवढा मोठा धातूचा गोळा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यामुळे आश्चर्यही व्यक्त होत आहे.

Story img Loader