Mystery Illness in Jammu and Kashmir Rajouri : जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका गावात अज्ञात आजारामुळे लहान मुलांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसातच या गूढ आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या वाढून आठ वर पोहचली आहे. बुधवारी या परिसरातील एका रुग्णालयात आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर प्रभावित झालेल्या गावात होत असलेल्या मृत्यूच्या घटनांच्या तपासात मदत करण्यासाठी प्रशासनाकडून तज्ज्ञांची केंद्रीय टीम स्थापन करण्यात आली आहे.
हा नेमका आजार काय आहे? हे शोधण्यासाठी तसेच रुग्णांची तपासणी वेगाने करता यावी यासाठी बायोसेफ्टी लेव्हल ३ (BSL-3) मोबाईल प्रयोगशाळा देखील राजौरी येते पाठवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या आजारामुळे महोमद रफिक यांचा १२ वर्षीय मुलगा अश्फाक अहमद याचा देखील मृत्यू झाला आहे. त्याच्यावर सहा दिवसांपासून जम्मू येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. त्याला यापूर्वी उपचारासाठी चंदीगड येथे पाठवण्यात आले होते, तरीही त्याला वाचवण्यात यश आले नाही असेही अधिकार्यांनी सांगितले.
अशफाकच्या धाकट्या भावंडेसात वर्षांचा इश्तियाक आणि पाच वर्षांची नाझिया यांचाही गेल्या गुरुवारी मृ्त्यू झाला होता. अशफाकच्या मृत्यूने कोटरंका (Kotranka) तहसीलच्या बाधाल (Badhaal) गावातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. मृत्यू झालेले सर्व लोक हे एकाच गावातील दोन कुटुंबातील आहेत.
राजौरीचे उपआयुक्त अभिषेक शर्मा यांनी कोटरंका सोमवारी भेट दिली आणि बधाल गावात काय परिस्थिती आहे याची पाहाणी केली. या गावात १४ वर्षांखालील सहा बालकांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा >> बाजारपेठेत कोलाहल! Sensex च्या गटांगळ्या, १२०० अंकांनी घसरला; Share Market मध्ये नेमकं काय घडलं?
“घटनेनंतर कारवाई करत एक बायोसेफ्टी लेव्हल 3 (BSL-3) मोबाईल प्रयोगशाळा राजौरीला पाठवण्यात आली आहे. प्रकरणे आणि मृत्यूच्या तपासात प्रशासनाला मदत करण्यासाठी तज्ञांची एक केंद्रीय टीम तयार करण्यात आली आहे,” अशी माहिती प्रशासनाच्या प्रवक्त्याने दिली आहे.