घर मालकाने दोन वर्षांपासून बंद असलेला फ्लॅट जेव्हा उघडला तेव्हा बाथरुममधलं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळायची बाकी राहिली होती. कारण बाथरुममध्ये एक मोठा ड्रम होता. जो सिमेंटने सील करण्यात आला होता. जेव्हा हा ड्रम मालकाने उघडला तेव्हा त्यात मालकाला एक सांगाडा आढळला. तसंच बांगड्याही मिळाला आणि नाईट ड्रेससारखा कपडाही. एखाद्या भीतीदायक चित्रपटातला प्रसंग वाटेल अशी घटना कोलकाता या ठिकाणी वास्तवात घडली आहे.
नेमकी काय घडली घटना?
कोलकाता या ठिकाणी ज्या घरात सांगाडा सापडला ते घर त्या गोपाल मुखर्जी या घरमालकाने दोन वर्षांपूर्वी एका नेपाळी जोडप्याला भाडे तत्त्वावर दिलं होतं. करोना काळात हे जोडपं या फ्लॅटमध्ये वास्तव्य करत होतं. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या घरी जात आहोत. त्यांनी फ्लॅट बंद केला. पण ते दर महिन्याला भाडं पाठवत होते. शेवटी मालकाने त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांचा फोन बंद आला. मग मालकाला वाटलं की आपण घरी जाऊ आणि घर बंद आहे ते स्वच्छ करु.
घरी गेल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा बंद होता. त्याला कुलुप लावण्यात आललं होतं. याची कल्पना असल्याने मालक गोपाल मुखर्जींनी ते कुलुप तोडलं त्यानंतर आतमध्ये त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून त्याची पाचावर धारण बसली. या मालकाने तातडीने पोलिसांना बोलवलं. या माणसाच्या घरात जो सांगाडा आढळला आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ज्या जोडप्याला हा फ्लॅट भाडे तत्वावर दिला होता त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. जो सांगाडा मिळाला तो महिलेचा असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याविषयी माहिती दिलेली नाही.
घर मालकाने काय सांगितलं?
घर मालक गोपाल मुखर्जी याविषयी म्हणाले की दोन वर्षांपूर्वी मी एका नेपाळी जोडप्याला हा फ्लॅट भाडे तत्वावर दिला होता. मला ते भाडं वेळेवर देत होते. मात्र मागच्या काही महिन्यांपासून थोडा उशीर करत होते. आम्हाला आर्थिक अडचण आहे त्यामुळे भाडं द्यायला थोडा विलंब लागतो आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आत्ता दिवाळीच्या दरम्यान मी त्यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर मंगळवारी मी घराची साफसफाई करायला पोहचलो तेव्हा मला घराच्या बाथरुममध्ये सांगाडा आढळून आला असं मालकाने सांगितलं आहे. पोलिसांना भाडे करार मिळाला आहे त्याद्वारे ते या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त बिस्वजीत घोष म्हणाले की आम्ही जो सांगाडा ताब्यात घेतला आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सांगाडा कुणाचा आहे आणि मृत्यू कधी झाला याचा अहवाल मिळण्याची प्रतीक्षा आम्ही करतो आहोत असंही पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.