देशात २०२० मध्ये रस्ते अपघातांत झालेल्या मृत्यूंच्या १.२० लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही देशात दररोज सरासरी ३२८ लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०२० च्या वार्षिक ‘क्राईम इंडिया’ अहवालात खुलासा केला आहे की, गेल्या तीन वर्षात रस्ते अपघातांत ३.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

२०२० मध्ये रस्ते अपघातांत १.२० लाख मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, २०१९ मध्ये हा मृत्यूचा आकडा १.३६ लाख आणि २०१८ मध्ये १.३५ लाख इतका होता. त्याचसोबत, देशात २०१८ पासून ‘हिट अँड रन’च्या १.३५ लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीच्या अहवालात ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. केवळ २०२० मध्ये, ‘हिट अँड रन’ची ४१ हजार १९६ प्रकरणं होती. तर २०१९ मध्ये ‘हिट अँड रन’ची ४७ हजार ५०४ आणि २०१८ मध्ये ४७ हजार २८ अशी प्रकरणं होती.

दररोज ‘हिट अँड रन’ची सरासरी ११२ प्रकरणं

आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशभरात दररोज ‘हिट अँड रन’ची सरासरी ११२ प्रकरणं नोंदवली गेली. सार्वजनिक रस्त्यावर वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे दुखापत झाल्याची प्रकरणं पुढीलप्रमाणे : २०२० मध्ये १.३० लाख, २०१९ मध्ये १.६० लाख आणि २०१८ मध्ये १.६६ लाख इतकी नोंद करण्यात आली आहेत. तर गंभीर दुखापतीची प्रकरणं अनुक्रमे ८५ हजार ९२०, १.१२ लाख आणि १.८ लाख इतकी नोंद करण्यात आली आहेत.

रेल्वे अपघात आणि वैद्यकीय निष्काळजीपणा

अधिकृत आकडेवारीनुसार, रेल्वे अपघातांमध्ये २०२० साली ५२ मृत्यूंची प्रकरणं नोंदवली गेली. तर, २०१९ मध्ये ५५ आणि २०१८ मध्ये ३५ प्रकरणांची नोंद झाली आहे. एनसीआरबीची आकडेवारी दर्शवते की, २०२० मध्ये भारतात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात १३३ प्रकरणांची, तर २०१९ मध्ये २०१ आणि २०१८ मध्ये २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. अहवालानुसार, २०२० मध्ये नागरी संस्थांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूंची ५१ प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, २०१९ मध्ये १४७ आणि २०१८ मध्ये ४० प्रकरणांची नोंद झाली होती.

Story img Loader