पंतप्रधान रझा अश्रफ यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ तपास अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी देशभरात निदर्शने करण्यात येत असून मंगळवारी त्यामध्ये पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी प्रमुख यंत्रणेचे अधिकारीही सहभागी झाले होते.
पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये नॅशनल अकाऊण्टेबिलिटी ब्युरोचे (एनएबी) अधिकारी सहभागी झाले आणि त्यांनी कामरान फैझल यांच्या मृत्यूची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी केली. सरकारी निवासस्थानात फैझल गेल्या शुक्रवारी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते.
एनएबीचे प्रमुख फसीह बुखारी यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांना एक निवेदन सादर केले आणि फैझल यांच्या मृत्यूची चौकशी करावी व तपास अधिकाऱ्यांना उत्तम सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली. कोणत्याही दबावाविना अधिकाऱ्यांना काम करता येईल, याची खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही फैझल यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लाहोरमध्ये एनएबीच्या अधिकाऱ्यांनी काळे बिल्ले लावून निषेध नोंदविला, तर फैझल यांच्या मृत्यूबाबतचे पुरावे आणि त्यांच्या शरीरावर जखमा होत्या हा त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आरोप याकडे चौकशीदरम्यान दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तो फेटाळून अधिकाऱ्यांनी सेवेतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. आपल्या मागण्यांबाबत शक्य ती सर्व पावले उचलण्यात येतील, असे बुखारी यांनी
सांगितले.

Story img Loader