कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. तर, चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचाही विजय झाला आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत.
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात एकही आमदार नसणाऱ्या आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु झाली आहे.
नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटकपक्ष असलेली नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी ( एनडीपीपी ) सध्या आघाडीवर आहे. एनडीपीपी सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. यातच आता रामदास आठवलेंनी थेट नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले आहेत. टूएनसंद सदर – २ विधानसभा मतदारसंघाचे उमेदावर इम्तिचोबा आणि नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिया ओनेने चॅग हे विजयी झाले आहेत.
नागालँड विधासभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आठ उमेदवार उभे केले होते. त्यातील दोघांचा विजय झाला आहे. ‘ऊस शेतकरी’ या निशाणीवर रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.