नागालँडमध्ये १४ सामान्य नागरिकांचा मृत्यूनंतर भारतीय सैन्याला विशेष आणि अधिकचे अधिकार देणाऱ्या अफ्सा कायद्याविरोधात जनभावना तयार झाली आहे. त्यामुळेच भाजपाचा समावेश असलेल्या नागालँड सरकारने आता केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. नागालँड सरकारने अफ्सा कायदा देशावर काळा दाग असल्याचं म्हणत केंद्राने आता हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. भारतीय सैन्याने कट्टरतावाद्यांविरोधात राबवलेल्या एक अभियानात केलेल्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाल्याने नागालँडमधील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
नागालँडच्या राज्य सरकारने सध्या तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (७ डिसेंबर) कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळाने नागालँडमधील अफ्स्पा कायदा रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. आता नागालँड सरकार याबाबत केंद्र सरकारला लेखी मागणी करणार आहे. या बैठकीत याशिवाय राज्यात सुरू असलेला प्रतिष्ठित हॉर्नबिल उत्सव देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एसआयटीला या प्रकरणाचा तपास १ महिन्यात करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी सैनिकांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारात देखील सहभाग घेतला. तसेच तेथेही नागालँडमध्ये अफ्स्पा कायदा नको, अशी भूमिका जाहीर केली. अफ्स्पा कायदा हा देशाच्या प्रतिमेवर काळा दाग आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
नागालँडमध्ये नेमकं काय झालं? अमित शाहांनी घटनाक्रम सांगितला
अमित शाह म्हणाले, “सैन्याला कट्टरतावादी येण्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. याआधारे सैन्याच्या २१ पॅराकमांडोच्या एका पथकाने ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी संशयित परिसरात अंबुश लावले. त्यावेळी एक वाहन अंबुश लावलेल्या ठिकाणाच्या जवळ आलं. सैन्याने ते वाहन थांबवण्याचा इशारा केला. यानंतर वाहन थांबण्याऐवजी त्या ठिकाणाहून वेगाने पळून जात असल्याचं दिसलं. यानंतर या वाहनात संशयित कट्टरतावादी जात असल्याच्या संशयावरून सैन्याने या वाहनावर गोळीबार केला.”
“नागालँडमध्ये चुकीच्या लोकांवर गोळीबार”
“या गोळीबारात या वाहनातील ८ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला. नंतर हे लोक कट्टरतावादी नसल्याचं समोर आलं आणि चुकीच्या लोकांवर गोळीबार झाल्याचं स्पष्ट झालं. जखमी दोघांना सैन्यानेच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सैन्याच्या या तुकडीला घेरत हल्ला केला आणि २ वाहनं जाळण्यात आली. यात सुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला, तसेच अनेक जवान जखमी झाले,” अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
“१ महिन्यात एसआयटीचा तपास अहवाल सादर होणार”
अमित शाह पुढे म्हणाले, “यानंतर सैन्याला आपल्या सुरक्षेसाठी आणि जमाव पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. त्यात आणखी ७ नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच इतर काही जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न केले आहेत. आत्ता परिस्थिती तणावपूर्ण, मात्र नियंत्रणात आहे. नागालँडच्या पोलीस महासंचालकांनी ५ डिसेंबरला घटनास्थळाचा दौरा केला आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. एसआयटी नेमली असून १ महिन्यात हा तपास पूर्ण करण्यास सांगितले आहे.”
हेही वाचा : नागालँड पोलिसांनी लष्कराच्या तुकडीविरोधात नोंदवला एफआयआर ; १४ नागरिकांच्या हत्येचा लावला आरोप!
“या घटनेनंतर ५ डिसेंबरला सायंकाळी २५० लोकांच्या हिंसक जमावाने मोन शहरात आसाम रायफलच्या कंपनी ऑपरेटर बेसवर तोडफोड केली. जमावाने सीईओबीच्या घराला आग लावली. यानंतर आसाम रायफलला जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. यामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. या परिसरात आणखी काही अप्रिय घटना घडू नये म्हणून अतिरिक्त बळाची तैनाती करण्यात आली आहे,” असंही शाह यांनी नमूद केलं.