मुझफ्फरनगरमधील दंगलींमागे ‘आयएसआय’चा हात असून त्यांनी येथील काही मुस्लिम तरुणांना हाताशी धरून त्या घडविल्या होत्या, या राहुल गांधी यांच्या विधानाचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झाशी येथील प्रचारसभेत खरपूस समाचार घेतला. त्या हस्तकांची नावे जाहीर करा, नाही तर विस्थापितांच्या छावणीत आश्रयास असलेल्या तरुणांची माफी मागा, असे ठणकावत मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या जखमेवर फुंकर घातली. तसेच आजीची हत्या केल्याबद्दल शीख समाजाविषयी माझ्या मनात राग होता, या राहुल यांच्या विधानाचाही समाचार घेताना, काँग्रेसजनांच्या मनातही राग होता म्हणूनच शीखविरोधी दंगली घडल्या, याचीच ही कबुली आहे का, असा सवालही मोदी यांनी केला.
मी येथे माझी आसवे गाळण्यासाठी नव्हे, तर अश्रू पुसण्यासाठी आलो आहे, अशी सुरुवात करीत मोदी यांनी राहुल यांच्यावर थेट निशाणा धरला. राहुल यांनी आपल्या सभेत गुप्तचर संस्थेने माहिती दिल्याचा दावा केला होता. त्याला जोरदार आक्षेप घेताना मोदी म्हणाले, गुप्तचर संस्था एका खासदाराला गोपनीय माहिती कोणत्या आधारावर देतात? त्याउपर जर ही माहिती आहे तर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला रोखण्याची धमक काँग्रेसमध्ये का नाही?
राहुल गांधी यांना शहजादा असे संबोधून ते म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये निवासी छावण्यांत राहणाऱ्या युवकांचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी गुफ्तगू चालू आहे, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे. मग या तरुणांची नावे जाहीर करा आणि ते जमत नसेल तर या वक्तव्याबद्दल छावण्यांतील मुस्लिम समुदायाची माफी मागा, अशी मागणी मोदी यांनी केली.

पंतप्रधान नव्हे, रखवालदार
तुम्ही मला देशाचे पंतप्रधान करू नका, रखवालदार करा. दिल्लीत मी देशाच्या तिजोरीचे रक्षण करीन आणि तिच्यावर कोणत्याही ‘पंजा’ला डल्ला मारू देणार नाही. साठ वर्षे काँग्रेसला सत्ता दिलीत, आम्हाला साठ महिने सत्ता द्या. आम्ही देशाचे भवितव्यच नव्हे तर प्राक्तनही बदलून टाकू, असे मोदी यांनी सांगितले. झाशीच्या राणीची यादही त्यांनी काढली आणि १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ‘कमळ’ हेच चिन्ह प्रमुख होते, असेही आवर्जून सांगितले.

मुस्लीम, शीख, मागास वर्गाच्या भावनांना हात
’मुजफ्फरनगर दंगली तेथीलच काही तरुणांनी आयएसआयच्या इशाऱ्यावरून घडविल्या, या राहुल यांच्या विधानाची चिरफाड करीत तरुणांची नावे जाहीर करा, नाही तर त्या समुदायाची माफी मागा, असे बजावत मोदी यांनी मुस्लीम समाजाला जवळ केले.
’शीखविरोधी वक्तव्यावरून दिल्लीतील शीखविरोधी दंगलींची आठवण काढत शीखांच्याही भावनांना हात घातला. तसेच माझ्यासारख्या मागास समाजातल्या मुलाला पक्षाने पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली, असे सांगत मागास वर्गाच्या भावनांनाही हात घातला.

काँग्रेसकडून प्रतिवाद
मोदी यांनी राहुल यांच्यावर केलेली टीका पोरकट आहे. राहुल जबाबदार राजकीय नेते आहेत, ते खरे बोलतात, जातीय फूट पाडणाऱ्यांपासून लोकांना सावध करतात. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी युवकांना सावध केले. ते जे काही म्हणाले ते सर्व देशाला माहीत आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले. तर जातीय संघर्षांत भाजप तेल ओतत आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार
नवी दिल्ली : पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआय मुझफ्फरनगर दंग्यात होरपळलेल्या मुस्लीम युवकोंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला जातीयवादी ठरविले आहे. देशातील सर्वात मोठा जातीयवादी पक्ष काँग्रेस असल्याची जोरदार टीका माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. राहुल यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
गुप्तहेर प्रमुखाकडून पंतप्रधान व गृहमंत्र्यांना दिली जाणारी माहिती राहुल गांधी यांच्याकडे कशी पोहोचली, असा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला. राहुल यांच्या विधानामुळे मुस्लीम समुदाय दुखावला आहे, असे मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले.

Story img Loader