मुझफ्फरनगरमधील दंगलींमागे ‘आयएसआय’चा हात असून त्यांनी येथील काही मुस्लिम तरुणांना हाताशी धरून त्या घडविल्या होत्या, या राहुल गांधी यांच्या विधानाचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झाशी येथील प्रचारसभेत खरपूस समाचार घेतला. त्या हस्तकांची नावे जाहीर करा, नाही तर विस्थापितांच्या छावणीत आश्रयास असलेल्या तरुणांची माफी मागा, असे ठणकावत मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या जखमेवर फुंकर घातली. तसेच आजीची हत्या केल्याबद्दल शीख समाजाविषयी माझ्या मनात राग होता, या राहुल यांच्या विधानाचाही समाचार घेताना, काँग्रेसजनांच्या मनातही राग होता म्हणूनच शीखविरोधी दंगली घडल्या, याचीच ही कबुली आहे का, असा सवालही मोदी यांनी केला.
मी येथे माझी आसवे गाळण्यासाठी नव्हे, तर अश्रू पुसण्यासाठी आलो आहे, अशी सुरुवात करीत मोदी यांनी राहुल यांच्यावर थेट निशाणा धरला. राहुल यांनी आपल्या सभेत गुप्तचर संस्थेने माहिती दिल्याचा दावा केला होता. त्याला जोरदार आक्षेप घेताना मोदी म्हणाले, गुप्तचर संस्था एका खासदाराला गोपनीय माहिती कोणत्या आधारावर देतात? त्याउपर जर ही माहिती आहे तर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला रोखण्याची धमक काँग्रेसमध्ये का नाही?
राहुल गांधी यांना शहजादा असे संबोधून ते म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये निवासी छावण्यांत राहणाऱ्या युवकांचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी गुफ्तगू चालू आहे, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे. मग या तरुणांची नावे जाहीर करा आणि ते जमत नसेल तर या वक्तव्याबद्दल छावण्यांतील मुस्लिम समुदायाची माफी मागा, अशी मागणी मोदी यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा