संवेदनशील मन आणि आजूबाजूला घडणाऱ्या विविध घडामोडींवर भूमिका घेण्याच्या स्वभावामुळे अभिनेते नाना पाटेकर कायमच चर्चेत असतात. विविध विषयांवर त्यांनी मांडलेली मतं प्रश्नाच्या मूळापर्यंत जाऊन भविष्याचा वेध घेणारी असतात. गरज पडल्यास समोरच्याचा विचार न करता त्याला खडे बोल सुनावण्याची ताकदही नाना पाटेकर यांच्याकडे आहे. टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या संशयास्पद आत्महत्येनंतर अनेक वाहिन्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे नाना पाटेकर यांनी त्यांना फटकारले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणतात, प्रत्युषाचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. पण मला असं दिसतंय की हा विषय माध्यमांनी सातत्याने लावून धरला आहे. गावांमध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचे काय? त्यांच्या आयुष्याचे मोल काहीच नाही का? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
नाना पाटेकर गेल्या काही महिन्यांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना, महिलांना आर्थिक मदत करत आहेत. या कामामध्ये अभिनेता मकरंद अनासपुरेही त्यांच्यासोबत काम करत आहे. नाना पाटेकर यांनी आर्थिक मदत देण्याला सुरुवात केल्यानंतर राज्यासह देशभरातून त्यांच्याकडे मदतीसाठी आर्थिक ओघ सुरू झाला. अनेकांनी नाम फाऊंडेशनला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader