दिल्लीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेते नितीन राऊत आणि सुनिल केदार यांची पक्षाच्या हायकमांडसोबत बैठक पार पडली. यानंतर नितीन राऊत आणि सुनिल केदार यांनी ‘पार्टी तो पार्टी होती है’ म्हणत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. याबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारणा केली. यावर नाना पटोले यांनी ते का बोलले नसावेत याबाबत मत व्यक्त केलं.
नाना पटोले म्हणाले, “मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष इथं असल्याने आणि ही संघटनात्मक बैठक असल्याने प्रदेशाध्यक्ष बोलतील असंच त्यांना वाटलं असेल. त्यामुळे ते न बोलता गेले असतील.”
“हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड झाली पाहिजे”
“आजच्या बैठकीत आता होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड झाली पाहिजे यावर चर्चा झाली. २८ डिसेंबरपर्यंत अधिवेशन असेल. त्यामुळे किमान २६/२७ डिसेंबरपर्यंत ही सर्व निवडीची प्रक्रिया व्हावी अशी आमची भूमिका आहे. यावर हायकमांडशीही चर्चा झाली. मला वाटतं या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होईल,” असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणाची निवड?
सध्या काँग्रेसच्या एखाद्या विद्यमान मंत्र्याला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगून त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. यावर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, “कुणाला विधानसभा अध्यक्ष करायचं, कुणाला मंत्री करायचं हा हायकमांडचा निर्णय असेल. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाचे नोटिफिकेशन निघेल त्याच दिवशी हायकमांड उमेदवाराची घोषणा करेल.”
“लोकसभेच्या उपाध्यक्षाचं पद गेल्या २ वर्षांपासून रिक्त”
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आधी गुप्त पद्धतीने आणि आता आवाजी पद्धतीने निवडणूक होत आहे यावर टीका केली. नाना पटोले यांनी फडणवीसांच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिलं. “फडणवीस मोदींवर कधी टीका करत नाही, त्यांनी ती केली पाहिजे. लोकसभेच्या उपाध्यक्षाचं पद गेल्या २ वर्षांपासून रिक्त आहे. लोकसभेत उपाध्यपदाची निवड खुल्या पद्धतीने होते. त्याला गुप्त पद्धत नसते.”
हेही वाचा : विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचा मोठा निर्णय ; ऐनवेळी बदलला नागपूरमधील उमेदवार!
“देशात सुधारणा झाल्या तेव्हा देशभरात खुल्या पद्धतीचा कायदा आला. महाराष्ट्रात तो नव्हता, त्यात सुधारणा करण्यात आली. ते काही गैर नाही. फडणवीसांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा लोकसभेतील उपाध्यक्ष पद खाली आहे त्यावरही त्यांनी दोन शब्द बोलावे,” असं म्हणत नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.