भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल दिवसभर अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच राहुल गांधींनीही अटलबिहारींच्या समाधीस्थळी जाऊन सामाधीचं दर्शन घेतलं. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या एका नेत्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘इंग्रजांचे एजंट’ असं म्हटलं आहे. मात्र या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंनी सहमत नसल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे समन्वयक आणि काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केले. या ट्विटवरून गदारोळ माजला आहे. पांधी यांनी केलेल्या ट्विटनुसार, १९४२ मध्ये, इतर सर्व आरएसएस सदस्यांप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत छोडो आंदोलनावर बहिष्कार टाकला आणि चळवळीत सहभागी झालेल्यांविरुद्ध ब्रिटिश गुप्तहेर म्हणून काम केले. याच विधानावर नाना पटोलेंनी मत व्यक्त केलं आहे.
आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामाकाजाला सुरुवात होण्यापूर्वी नागपूरमधील विधानभवनाबाहेर पत्रकारांशी नाना पटोलेंनी चर्चा केली. त्यावेळी पटोलेंना, “तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर काम करणाऱ्या गौरव पांधींनी वाजपेयी यांना इंग्रजांचं एजंट म्हटलं आहे,” असं म्हणत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पटोलेंनी, ” दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे गौरव यांनी काय म्हटलं मला ठाऊक नाही. मात्र राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान जो प्रेमाचा संदेश देण्याचं काम सुरु केलं आहे त्याचं देशातील जनतेनं कौतुक केलं आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सामान्य व्यक्ती, युवक आणि वरिष्ठ लोकही सहभागी झाले,” असं म्हणत आपण गौरव गांधींच्या मताशी सहमत नसल्याचं म्हटलं.
अटलबिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भात बोलताना पटोलेंनी अनेकदा काँग्रेस सरकारचे आणि देशाचे प्रतिनिधी म्हणून अटलजींनी परदेशात भारताची भूमिक मांडली. “अटलजी हे विरोधी पक्षात होते. पाकिस्तानचा विषय असो, चीनचा विषय असो अमेरिकेमध्ये जाणं असो काँग्रेसचं सरकार त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवून या देशांबरोबर वार्तालाप केले जायचे. अटलजींनी कायमच या देशाला तोडण्याचं नाही जर जोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे अटलजी आदरणीयच आहेत,” असं नाना पटोले म्हणाले.
“राहुल गांधी ज्या हेतूने चालत आहेत त्यामध्ये अटलजींचा संदेशही आहे. त्यामुळे अशा शांतीदूतांच्या समाधीवर राहुल गांधी गेले तर त्यात काही चूक नाही,” असंही नाना पटोले म्हणाले.