देशातील नागरीकांना विशिष्ट ओळख क्रमांक देणाऱ्या ‘आधार’ ओळखपत्राची संकल्पना मांडणारे नंदन निलेकानी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रसच्या तिकीटावर लढवण्याची शक्याता आहे. निलेकानी लवकरच काँग्रस पक्षात दाखल होणार असल्याची शक्यता त्यांनी स्वत: वर्तविली आहे.
‘संपुआ-२’ च्या सुरूवातीला निलेकानी यांच्या समोर काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेले निलेकानी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तुलनेने कमी राजकीय असलेले मनुष्यबळ विकास मंत्रालय देऊ केले होते.
एवढेच नाही तर, ‘संपुआ’ अध्यक्षा सोनीया गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी निलेकानी यांच्या समोर  नियोजन आयोगाचे सदस्य होण्याचा देखील प्रस्ताव ठेवला होता. मात्र निलेकानी यांना नियोजन आयोगामध्ये रस नसल्या कारणामुळे त्यांनी तो नाकारला होता. त्यानंतर त्यांनी भारताच्या प्रत्येक नागरीकाला एक विशिष्ट ओळख क्रमांक देणाऱ्या आधारचे आव्हान स्विकारले.
सोनीया गांधी यांचा निलेकानी यांना सतत पाठिंबा मिळाला आहे. मुळचे बेंगलुरूचे सहिवासी असलेले निलेकानी आपल्या घरच्या मैदानावरून राजकारणाच्या सामन्याला सुरूवात करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, निलेकानी रहिवासी असलेल्या दक्षिण बेंगलुरू लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद खूपच कमी आहे.