एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची स्तुती करणे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांना चांगलेच भोवले आहे. कारण, अशी स्तुती केल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई करीत केंद्रीय कमिटीतून निलंबित केले आहे.
CPI(M) Central Committee: We've decided to suspend Maharashtra CC secretary, Narasayya Adam, from the Central Committee for 3 months. This is a consequence of his speech at a public event in Solapur in presence of the Prime Minister & Maharashtra CM which hurt the party’s image. pic.twitter.com/mkyD7iyLvm
— ANI (@ANI) March 4, 2019
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात अडाम यांनी मोदींचे कौतुक केले. मात्र, अशी स्तुती करणे हे कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याने आडम यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार, आडम यांना पुढील तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून निलंबित करण्यात आले आहे.
याच वर्षी ९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापुरातील कष्टकरी कामगारांच्या ३० हजार घरांचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी आडम मास्तर यांनी फडणवीस आणि मोदींचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पंतप्रधान मोदींमुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दांत आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती करताना पुढचे पंतप्रधान तेच असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
तसेच याच भाषणात आडम यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना फडणवीस यांनी शब्द पूर्ण केला आणि आमचा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंजूर करून आणला. यापूर्वीचा १० हजार घरांचा प्रकल्प माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मंजूर केला होता. आताचा प्रकल्प मोदी यांनी पूर्ण करण्यास मदत केली आहे, असेही ते म्हणाले होते. आडम मास्तर यांची भाजपा विरोधक अशी ओळख आहे. विधानसभेतील त्यांची कामगिरी नेहमीच आक्रमक अशी राहिली आहे, त्यामुळे मोदींच्या कौतुकाने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.