इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या भूमिका व व्यवसायाकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टीकोनामुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आठवड्यात किती तास काम केलं पाहिजे? यासंदर्भात केलेल्या विधानामुळे बरीच चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी नारायण मूर्तींच्या या भूमिकेवर टीकाही केली होती. त्यानंतरही आता नारायण मूर्तींनी पुन्हा एकदा आठवड्यातल्या कामाच्या तासांबाबत विधान केलं आहे. तसेच, त्यांनी तरुणांना यासंदर्भात एक आवाहनदेखील केलं आहे.
काय आहे कामाच्या तासांसंदर्भातील मुद्दा?
नारायण मूर्तींनी गेल्या वर्षी भारतीयांनी आठवड्याला किती तास काम करायला हवं? याबाबत भूमिका मांडली होती. त्यांच्यामते भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवं. याचाच अर्थ दिवसाला १० तास आणि एकही सुट्टी न घेता आपण काम केलं पाहिजे, अशी भूमिका नारायण मूर्तींनी मांडली. ते स्वत: इन्फोसिसच्या स्थापनेवेळी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचे, असं त्यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. त्यावेळी त्यांच्या या भूमिकेचा एकीकडे आदरपूर्वक स्वीकार केला गेला, तर दुसरीकडे अमानवी असल्याची टीकाही झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा यासंदर्भात त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले नारायण मूर्ती?
कोलकातामध्ये नारायण मूर्ती चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना भारतातील तरुणांबाबत विचारणा केली असता त्यांनी ७० तास कामाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दर्शवलं. तसेच, भारतीय तरुणांनी कठोर मेहनत घेऊन आपल्या देशाला क्रमांक एकवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं आवाहनही त्यांनी केलं. गरिबीसारख्या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणखी वाढवायला हव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी झटून काम करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं.
ळ
८० कोटी भारतीय रेशनिंगवर अवलंबून!
दरम्यान, यावेळी ८० कोटी भारतीय रेशनिंगवर अवलंबून असल्याचा उल्लेख नारायण मूर्ती यांनी केला. “८० कोटी भारतीय आजही मोफत मिळणाऱ्या रेशनिंग धान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची मोठी गरज आहे. मग यासाठी जर आपण कठोर मेहनत करणार नसू, तर कोण करणार?” असा सवालही नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला.