भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी राजकीय भविष्यवाणी केलीय. यावेळी त्यांनी एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असंही मत व्यक्त केलंय.

महाराष्ट्र सरकार भेदभाद करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”

“आजारी आणि बेडवर असलेल्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य वाटत नाही”

उद्धव ठाकरे यांचं सरकार फार दिवस नसेल का असं विचारलं असता नारायण राणे यांनी जो व्यक्ती आजारी आहे आणि बेडवर आहे त्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणं योग्य नाही असं उत्तर दिलं. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचं आघाडीचं सरकार आहे त्याचं आयुष्य जास्त नसल्याचाही सूचक इशारा राणेंनी दिला. यावेळी पत्रकारांनी मार्चपर्यंत सरकार बदलणार का असं विचारलं असता त्यांनी हसत त्यावर उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

“नारायण राणे काय बोलतात याकडे लक्ष देत नाही”

नारायण राणे यांच्या या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला लगावला.

Story img Loader