केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर, सर्वाधिक चर्चा झालेल्या नारायण राणेंना नेमकी काय जबाबादरी मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. अखेर, आजच नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील भाजपा नेते भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. याचबरोबर भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Cabinet Expansion : नव्या मंत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर! मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री!

याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वाधिक चर्चा होती ती देशाच्या आरोग्य मंत्रालयाची. डॉ. हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिल्यानंतर ऐन करोनाच्या काळामध्ये कुणाच्या खांद्यावर आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल? याविषयी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवर लगेचच पडदा पडला असून मनसुख मांडवीय यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ चार व्यक्तींचे आभार!

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले असून त्यांचे ऋणी असल्याचं सांगितलं आहे. “आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन”, असं राणे यावेळी म्हणाले.

Story img Loader